मंगळवार, १० एप्रिल, २०१८

हिंदू कोण – ५०

मागील भागातून पुढे –
१०. आहारा नंतर विहाराबद्दलचे मार्गदर्शन -
६६. एक उदाहरण घेऊन ह्या चार मुलभूत घटकांचे एकमेकांशी असलेले संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करू या. समजा, एक मोटारगाडी आहे, तिचा चालक आहे त्यात एक प्रवासी बसला आहे त्याशिवाय त्या प्रवाशाबरोबर त्याचा एक नोकर आहे. ह्यांत गाडी म्हणजे देह, चालक म्हणजे जीव, एक प्रवासी म्हणजे आत्माराम म्हणजे आपण स्वतः आणि नोकर म्हणजे लिंगदेह.
आपले जीवन म्हणजे त्या गाडीचा प्रवास, जोवर चालक गाडी स्वतःच्या उपजत बुद्धिने चालवत असतो तोवर सर्वकांहीं व्यवस्थितपणे होत असते. परंतु, जेव्हां प्रवासी चालकाला त्याचे काम त्यांने कसें करावे ह्यावर सुचना देऊ लागतो तेव्हां गाडीच्या प्रवासांत गोंधळ सुरु होतो. असे होण्याचे कारण, प्रवाशा बरोबर जो नोकर (लिंगदेह) असतो तो प्रवाशाला वेळोवेळी कांहीं सल्ला देऊ लागतो. त्या सल्ल्यानुसार आत्मा जीवाला सुचना देऊ लागतो. निसर्ग नियमानुसार प्रवाशाने गुपचुप बसावयाचे असते चालकाला त्याचे काम त्याच्या उपजत बुद्धिनुसार करू द्यावयाचे असते. पण प्रत्यक्ष जीवनात तसे होत नाही सर्व प्रकारचे प्रश्र्न जीवनात उपस्थित होत जातात. आता आपण ह्या उदाहरणातून प्रत्यक्ष परिस्थितीत येऊया. कथोपनिषदात नचिकेता यमास प्रश्र्न विचारतो त्यात रथाची रुपक कथा आहे त्यात असाच दृष्टांत दिला आहे.
माणसाचे जीवनक्रम हे ह्या गाडीच्या प्रवासा सारखे असते. देहाचे व्यवहार जीव त्याच्या उपजत बुद्धिनुसार न चुकता करण्यास सक्षम असतो पण त्याच्या कामात आत्मा ढवळाढवळ करू लागतो व ते लिंगदेहाच्या सल्ल्याने होत असते. लिंगदेहाकडे त्या आत्म्याच्या पूर्वजन्माच्या अनेक बर्यावाईट आठवणी साठवलेल्या असतात त्यातून हे सल्ला देण्याचे काम आपसुकपणे तो करू लागतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे व त्याचे नियंत्रण करणे ह्यालाच योगसाधना असें म्हणतात. खरे योगी जीवाच्या कामांत कधीही हस्तक्षेप करीत नाहीत. पण सामान्य माणसाचा आत्मा ते करण्याची चुक सहसा करीत रहातो व त्यातून जीवनातील गुंतागुंती उत्पन्न होत जातात. हा हिंदू तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा आहे. देहाच्या चार गरजा (पोषण, संरक्षण, प्रजनन विश्राम) पूर्ण करण्याच्या कामाला गीतेत योगक्षेम असें म्हंटलेले आहे. आत्म्याने जर त्यात ढवळाढवळ करता ते सर्व चालू दिले तर माणसाचे जीवन सुखी होऊ शकते परंतु, गोष्टी तितक्या सहज सोप्या नसतात, कारण, गतजन्माच्या भोगवट्यानुसार तो लिंगदेह आत्म्याच्या माध्यमातून जीव देहाच्या व्यवहारात हस्तक्षेप करतोच! योगसाधना म्हणजे, लिंगदेहाचे ह्या जीव देहाच्या कामात लुडबुड करणे थांबवणे. कांही प्रकारची लिंगदेहाची लुडबुड हितकारक असते कांही प्रकारची घातक असते. त्याचा योग्य निर्णय घेणे साधकांस जेव्हां जमते तेव्हां तो साधक साधनेत य़शस्वी ठरतो. आता आपण चार मुलभूत गरजांचा व्याप किती आहे ते पहावयाचे आहे. लिंगदेहाचे व्यवहार हा एक मोठा विषय आहे त्यात आपण शिरणार नाही. योगशास्त्र शिकणार्यांना मात्र तो विषय सविस्तरपणे शिकावा लागतो. चांगला गुरु मिळाला तर तो ते शिकवतो, असो. जीव देहाच्या संवर्दनसाठी ज्या चार गोष्टींवर विचार करतो ते येथे दिले आहेत. शहाण्या हिंदूच्या आत्म्याने त्यांत (म्हणजे जीवाच्या कामात) ढवळाढवळ करावयाची नसते.
पोषण ह्यात जीवनातील बहुतेक व्यवहार येतात. शिकणे, शिकवणे, पैसे कमावणे, काम करणे, उद्योग करणे, खाणे, पिणे, शरीराचे संवर्धन, वगैरे, असे कित्येक येतात. त्यांच्या कमाल किमान मर्यादा सांभाळून ते व्यवहार करणे हिंदूंसाठी हितकारक समजले आहे. म्हणून त्या मर्यादा समजून आपले जीवन त्यांने व्यतीत केले पाहिजे असे अपेक्षिलेले आहे. ह्या सर्वांत लिंगदेहाचा हस्तक्षेप सतत होत असतो त्याचे योग्य नियमन करणे ह्यालाच जगण्याची कला असे थोडक्यात म्हणता येईल.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – २३५ -२४५
परंतु जर शेळी, बकर्या व मेंढी कोल्ह्याने खाल्ली, लांडग्याने घेरले आणि त्यांनें कांहीं केले तर त्याची जबाबदारी त्याच्यावर असते. जेव्हां जनावरं व्यवस्थितपणे वनांत चरत आहेत आणि अचानक एक लांडगा एकादी शेळी मारून घेऊन गेला तर त्याची जबाबदारी गुराख्यावर नसेल, तो अपघात समजला जाईल. २३६
गांवाच्या चौफेर शंभर धानु अथवा बाणाच्या फेकीच्या तिप्पट एवढी जागा चराई म्हणून राकसी जाईल. नगराच्या भोवती त्याच्या तिप्पट जागा चराई म्हणून राखली जाईल. २३७
शेता भोवती कुंपण नसेल तर त्या शेतात जनावरं शिरून जे नुकसान होईल त्याची जबाबदारी राजा गुराख्यावर टाकणार नाही. २३८
शेतकरी त्याच्या शेता भोवती उंट डोकावून शेतांत पहाणार नाही इतके उंच वई शेतकर्याने केली पाहिजे. तसेंच कुत्री घुसू शकणार नाही इतकी दाट वई (कुंपण) करील. २३९
गाईगुरं कधी तरी हुडपणा करून शेतात घुसतात त्या बद्दल त्याच्या गुराख्याला शंभर पन्ना दंड असेल. जर गुरं गुराख्या शिवाय असतील तर शेताची राखण करणार्याने ती गुरं बाहेर पिटाळावयाची असतात. शेतातील जे नुकसान गुरांमुळें होईल ते सर्व गुरांच्या मालकाला भरून द्यावे लागते. त्यासाठी दर असेल एका गुरासाठी सव्वा पन्ना दंड होईल. तो राजा घेईल. हा सर्वमान्य नियम आहे. २४१
परंतु, मनू असें सांगतो किं, ज्या गाईने नुकतेच वासराला जन्म दिला आहे त्या गाईने त्यानंतरच्या दहा दिवसात जर कांहीं नुकसान केले तर त्याची भरपाई देण्याची तिच्या मालकांला आवश्यकता नाही. २४२
जर शेतकर्याच्या निष्काळजीपणामुळें पिकाचे नुकसान झाले तर राजाच्या हिश्श्या एवढी दंड त्याला भरावा लागेल. २४३
गुराचा मालक, गुराखी व शेतकरी हे सर्व जण आपापल्या जबाबदार्या सांभाळून कामं करतील ह्यासाठी हे नियम आहेत हे लक्षात घेऊन चांगला राजा त्याची अंमलबजावणी करील. कोणताही जाचकपणा करणार नाही. २४४
जर दोन गांवाच्या सीमेचा प्रश्र्न असेल तर ज्येष्ठ महिन्यात त्याचा निवाडा राजा करील. कारण, त्या महिन्यात सर्व सीमारेषा सहजपणे दिसू शकतात. २४५

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा