शनिवार, १ जून, २०१९

हिंदू कोण – ६६

मागील भागातून पुढे
८०. आपण पाहिले किं, मृतात्म्यास आपल्याला संपर्क करण्याला वेळ लागतो. माझ्या आईस मला सांगण्यास कांही महिने कां लागले? त्या मुलास सुद्धा पुन्हा स्वप्नात येण्यास कांही महिने लागले असें कां? अशा अनेक प्रश्र्नांची उत्तरे माहीत नाहीत. एवढे मात्र हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे किं, पिशाच्चांस व देवतांस संपर्क करण्यासाठी वेळ लागतो. म्हणून जर तो कांही साधना करीत असेल तर त्याचे त्वरीत परिणाम मिळावेत अशी अपेक्षा करू नये. अधीर न होता आपली साधना चालू ठेवावी.
८१. मृतात्मा पिशाच्च अवस्थेत असतांना इतर प्राण्यांत प्रवेश करू शकतात. त्याला पछाडणे असें म्हणतात. माणसांत फक्त मनुष्य गणात असणार्या व्यक्तिलाच पिशाच्च पछाडू शकते (जन्म पत्रिकेतील अबकहडा चक्रात तो गण दिलेला असतो) पण इतर प्राण्यात कोणत्याही जीवांस, विषेशकरून कावळ्याला, पछाडू शकते. इतर प्राण्यांत्याती आत्मा सुप्त अवस्थेत असतो म्हणजे नसल्या सारखाच असतो, तरी पिशाच्च त्याच्या मेंदूवर प्रभाव करू शकते. विशेषकरून जो मृतात्मा असंतुष्ट असतो तोंच अशारितीने प्राण्यावर बसतो. कुत्रा अशी असंतुष्ट पिशाच्च पाहू शकतो असें समजतात. बर्याच वेळा अशी भूत पाहून कुत्री रडू लागतात.
आणखीन कांहीं गोष्टी लक्षात घ्यावयाच्या असतात. त्या अशा किं, साधारणपणे माणसे पिशाच्च, भूत असें म्हंटले किं, ताबडतोब घाबरून जातात ते बरोबर नसते. बर्याच वेळा ही पिशाच्चे कांहीं सांगण्याचा प्रयत्न करीत असतात त्या वेळी माणसांने घाबरून कांहीं अयोग्य कारवाई केली तर ती त्याला त्रासदायक ठरू शकते. बर्याच वेळा ही पिशाच्चे अतिशय अडचणीत असतात, त्यांना माणसाच्या मदतीची गरज असतें अशा वेळी माणसांने त्यांना मदत करणे श्रेयस्कर असते. जर पिशाच्च संपर्क झाला तर प्रथम न घाबरतां त्या पिशाच्चास काऊ घास (पिंड) द्यावा व त्याला शांत होण्यास सांगावे. असें केल्याने ते अडचणीत असलेले भूत शांत होते व मग यथावकाश ते कांहीं संदेश देऊ शकते. यथावकाश असें सांगण्याचे कारण, भूत व माणूस ह्याच्यात संपर्क होण्यास कांहीं अज्ञात कारणांमुळे विलंब लागत असतो. त्यांच्याकडे आत्मियतेने पहावे. असें वागल्यास ती भूतं माणसांस पुढे सहायक होतात. भूतं नेहमीच वाईट नसतात. बर्याच वेळा ती उपयोगी येणारी असतात. पूर्वज भूत असेल तर विशेष आदरपूर्वक वागावे, ते चांगले असते. बिलकूल घाबरू नये. पिशाच्च्यांच्या अस्तित्वाची लक्षणे निश्र्चितच भयावह असतात तरी मन शांत ठेवून त्यांना सामोरी जावे. तूर्त एवढेच पुरे कारण, "पिशाच्च साधना", हा मोठा विषय आहे. शाक्त, अघोर व तंत्रविद्येची परंपरा जपणार्या हिंदूंच्या जीवनात ही साधना महत्वाची आहे, म्हणून ही माहिती दिली आहे.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – ९१ -४००
अशावेळी शहाणा राजा प्रथम त्या द्विजांना गोड बोलून शांत करील. त्यानंतर ब्राह्मणांना बोलावून त्याच्या मदतीने तो त्या द्विजांना त्यांची कर्तव्ये समजावून सांगेल. ३९१
जो ब्राह्मण आपल्या शेजारी ब्राह्मणास व तो त्याच्या शेजारी ब्राह्मणास, जरी ते सन्मानासाठी योग्य असले तरी, आमंत्रण देत नाही त्याला एक मशा एवढा दंड होऊ शकतो. ३९२
जो श्रोत्री दुसर्या योग्य श्रोत्रीस शुभकार्यासाठी बोलावत नाही त्याला तसे वागण्यामुळें त्या दुसर्या श्रोत्रीस एक जेवणाचा खर्च व राजाला तो एक सोन्याचे मासा एवढा दंड देईल. ३९३
आंधळा, मूर्ख, अपंग, काठी घेऊन चालणारा, सत्तरी ओलांडलेला, आणि जो श्रोत्रीस त्याचा वाटा देतो त्यांना राजाला कर भरावा लागत नाही. ३९४
राजा नेहमी श्रोत्रीस, आजारी माणसास, लहान मुलास, वयस्कर माणसास, उच्च कुलिन, सन्माननीय व्यक्तीस ह्यांच्याशी प्रेमाने वागेल. ३९५
परिट, सल्मली वृक्षाच्या गुळगुळीत फळीवर कपडे आपटून धुण्याचे काम करील. तो ज्याचे वस्त्रं त्यालाच देऊल व दुसर्याला वापरण्यास सुद्धा देणार नाही. ३९६
कोष्ठी दहा पना घेऊन कापड बनवेल ते अकरा पनाला विकेल. त्यापेक्षा जास्त किंमत घेतली तर त्याला बारा पना दंड होईल. ३९७
राजा वस्तुच्या किंमतीच्या विसाव्या भागा एवढा कर आकारेल. त्यासाठी जाणकार मंडळी वस्तुची किंमत आणणावळ, इतर खर्च, कच्च्या मालाची किंमत, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ती ठरवतील. ३९८
जर व्यापार्याने राजाच्या हक्काच्या चीजांची अथवा बंदी घातलेल्या मालाची निर्यात त्याला न विचारता केली तर त्या व्यापार्याची सगळी संपत्ती राजा जप्त करू शकतो. ३९९
जर व्यापार्यानी अबकारी कर न भरता माल विकला, मालाची योग्य किंमत दाखवली नाही, अयोग्य ठिकाणी व अयोग्य वेळी विक्री केली तर त्याने जेवढा कर बुडवला त्याच्या आठपट दंड तो भरेल. ४००

क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

बुधवार, १ मे, २०१९

हिंदू कोण – ६५


मागील भागातून पुढे
१६. मृत्यू नंतरचे जीवन
७९. ह्या संदर्भात आणखीन एक उदाहरण पाहू या. बर्याच वर्षापूर्वीची ही सत्य घटना आहे. एक वृद्ध महिला तिच्या नातवाच्या घरात रहात होती. तिचा तेथे वेळोवेळी अपमान होत होता. ती बिचारी असहायपणे ते सर्व गुपचुप सहन करीत रहात होती. अखेरीस तिचा मृत्यू झाला व तिचे दिवसवार केले गेले. तिला शिधा वाढला गेला. एका केळ्याच्या पानावर ते जेवण वाढले होते. एका अशा जागी ते ठेवले किं, कावळे तेथे येतील. पण आश्र्चर्याची बाब अशी किं, एकही कावळा आला नाही. असे बरेच दिवस ते तेथे होते पण कावळाच काय त्याच्या आजूबाजूनी फिरणारे उंदीर, घुशीसुद्धा त्याला स्पर्श करीत नव्हते. त्यावर धुळ जमू लागली व कालांतराने ते त्या धुळीत झाकले गेले. शेवटी पावसाच्या पाण्याने ते वाहून गेले. हा प्रकार वरकरणी सामान्य वाटला तरी हा तितका साधा प्रकार नाही हे संशोधकांच्या लक्षात आले. स्वाभाविकपणे कोणी जीवजिवाणू ते खावयास पाहिजे होते परंतु, तसें झाले नाही. साधी माशी, झुरळ असें कोणतेही त्याला कां नाही लागले? ह्याचे कारण काय? त्याचे स्पष्टीकरण असें सांगतात किं, भूताला दिलेले जेवण त्याचा हक्क असतो व कोणताही प्राणी तो हक्क टाळत नाही. ह्या उदाहरणातील म्हातारीच्या भूतानी ते जेवण राखून ठेवले व त्याद्वारा आपला तिरस्कार तिने व्यक्त केला.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ८१ -९०
ब्राह्मणाची हत्त्या करणे हे महापातक समजले जाते. म्हणून राजाने ब्राह्मणाची हत्त्या करणार्याचा साधा विचार सुद्धा करू नये. ३८१
जर वैश्याने सुरक्षित क्षत्रिय अथवा वैश्य स्त्रीशी लगट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला असुरक्षित ब्राह्मणीशी तसे केल्याची शिक्षा करावी. ३८२ टीपः येथे सुरक्षित म्हणजे लग्न झालेली असा घ्यावयाचा. असुरक्षित म्हणजे कुमारिका, विधवा, परित्यक्ता, भिकारीण किंवा वृद्धा असा घ्यावा.
जर ब्राह्मणांने सुरक्षित क्षत्रिय अथवा वैश्य स्त्रीशी वगट केली तर त्याला एक हजार पन्ना दंड करावा. जर सुरक्षित शुद्र स्त्रीशी क्षत्रिय अथवा वैश्य पुरूषानी प्रयत्न केला तर त्याला एक हजार पन्ना दंड करावा. ३८३
असुरक्षित क्षत्रिय महिलेशी वैश्य पुरूषाने समागम करण्याची शिक्षा आहे, पांचशे पन्ना दंड. क्षत्रिय पुरूषाने केला तर त्याची गाढवाच्या मुतांने हजामत करून पांचशे पन्ना दंड करावा. ३८४
जर ब्राह्मणाने असुरक्षित क्षत्रिय, वैश्य अथवा शुद्र महिलेशी समागम, सलगी केली तर दंड पांचशे पन्ना करावा. चांडाळ स्त्रीशी संभोग केला तर एक हजार पन्ना देड करावा. ३८५
ज्या राजाच्या राज्यात कोणी चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, कोणी कोणाची बदनामी करत नाही, कोणी कोणाची हत्त्या करत नाही, कोणी कोणावर हल्ला करत नाही, मारामार्या होत नाहीत म्हणजे त्याच्या राज्यात तमोगुणी लोक नाहीत असा राजा इंद्रपदी जातो. ३८६
हे पांच गुन्हे (चोरी, व्.भिचार, बदनामी, हत्त्या व हल्ला) नियंत्रित करण्याने तो राजा सर्व सामर्थ्यवान समजला जातो. ३८७
यजमान जो पुरोहिताचा त्याग करतो, जो पुरोहित यजमानाचा त्याग करतो, ज्यामुळें यज्ञ बिघडतात, (हा मोठा गुन्हा समजला आहे) अशा दोघांना प्रत्येकी शंभर पन्ना दंड करावा. ३८८
जातीच्या नांवाला काळिमा लागेल असें कोणतेही कृत्य केलेले नसतांना जर कोणी आपले आप्त जसें, आई, बाप, मुलगा, पत्नी, मुलगी ह्यांना टाकले तर तो गुन्हा ठरतो. त्यासाठी सहाशे पन्ना दंड सांगितला आहे. ३८९
जेव्हां द्विजांमध्ये कोणाचे कर्तव्य काय ह्या मुद्यावर वाद होतो तेव्हां राजा, जो स्वतः भले चिंतीतो, घाईने निर्णय घेणार नाही. ३९०
क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

हिंदू कोण – ६४

मागील भागातून पुढे –
१६. मृत्यू नंतर चे जीवन –
७८. श्राद्धाबाबतचे एक उदाहरण पाहू या.
आमच्या घरी एक तरुण मुलगा नेहमी येत असें. तो माझ्या भावाशी विशेष जवळचा होता. माझा भाऊ व त्याची पत्नी त्या मुलाला पुत्रवत माया देत असत. एकदा तो लिंगायत जातीचा तरुण त्याच्या गावी गेला व तेथे नदीत बुडून मेला. त्याच्या घरच्या मंडळींनी त्याचे दिवसवार त्यांच्या रितीरीवाजानुसार केले हे सर्व आम्हाला समजले. असेंच कांहीं दिवस गेले व एके रात्री माझ्या भावाच्या बायकोच्या स्वप्नात तो मुलगा आला. तो अतिशय उदास, खिन्न व ज्या चड्डीत तो मेला त्या पेहेरावात भिजलेल्या अंगाने तिच्या पुढे उभा राहिला. नेहमी हसरा आनंदी असणारा तो खेळकर स्वभावाचा मुलगा अशा अवस्थेत पाहून तिला आश्र्चर्य आणि वाईट वाटले. तो कांहींही बोलला नाही फक्त उभा होता. दुसर्या दिवशी तिने हे तिचे स्वप्न घरात सांगितले. आम्हा सर्वांना त्या स्वप्नांने वाईट वाटले. मी भावजयीला सुचवलें किं, तिने दुसर्या दिवशी काऊ घास त्याच्या नांवाने द्यावा. ते लक्षात घेऊन तिने त्या मुलाला आवडणार्या पदार्थांचा शिधा तयार केला व कावळ्याला वाढला. त्यानंतर कांहीं दिवसानंतर तो मुलगा तिच्या स्वप्नांत पुन्हा आला. मात्र ह्यावेळी तो त्याच्या नेहमीच्या रुबाबदार कपड्यात आणि त्याच्या नेहमीच्या आनंदी मुद्रेत आला होता. खूप हसत होता जणूकाय त्याला तो शिधा पोहोचला होता. त्यानंतर तो पुन्हा कधीच आला नाही.
ह्याचा अर्थ असा होतो किं, मृतात्म्यास शिधा त्याला प्रिय असणार्या मांणसांनी देणे आवश्यक असते. म्हणून हिंदू लोकांनी हे लक्षात घ्यावे किं, आपला कोणी प्रिय माणूस दिवंगत झाला तर त्याच्या नांवांने एकवेळ काऊघास जरूर द्यावा म्हणजे त्याच्या आत्म्यास शांति मिळेल. त्याच्या कुटुंबियाने सर्व वार दिवस केले असतील आपल्याला काय करावयाचे, असा विचार करून त्या गोष्टींकडे दुर्लत्र करू नये.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ७१ -८०
जर एकादी बाई तिच्या नातेवाईकांच्या मोठेपणाच्या घमेंडीत अथवा स्वताच्या तोर्यात येऊन नवर्याशी नीट वागत नसेल तर तिला भर चौकात कुत्र्याला खाण्यास द्यावे म्हणजे तिच्यानर भुकेली कुत्री सोडावीत. ३७१
परंतु, जर अशारितीने पुरूष स्त्रीशी वागला तर त्याला तापलेल्या लोखंडाच्या तव्यावर झोपवून मरे पर्यंत जाळावे. ३७२
एकदा व्यभिचार केलेल्या पुरूषास पुन्हा दुसर्या वर्षी तोंच गुन्हा करतांना सापडला तर, दुप्पट दंड करावा. असें तो पुन्हा पुन्हा करीत असेल तर दरवेळी दंडाची रक्कम वाढवत जावे. जर तो उनाड व चांडाळ स्त्रीशी समागम करील. ३७३
शुद्राने द्विजाच्या असुरक्षित स्त्रीवर जबरदस्ती केली तर त्याचे लिंग छाटावे. जर ती सुरक्षित असेल तर त्याचे सर्वस्व त्याच्या पासून काढून घ्यावे. ३७४
सुरक्षित ब्राह्मणीशी वैश्याने समागस केला तर त्याची संपत्ती काढून घ्यावी व त्याला एक वर्षासाठी कैद करावे. जर क्षत्रियाने तसे केले असेल तर त्याला एक हजार पना दंड करावा व गाढवाच्या मुताने त्याचे मुंडण करावे. ३७५
जर एकाद्या ब्राह्मणीशी क्षत्रियाने व वैश्याने अनैतिक संबंध असतील तर त्या वैश्य पुरूषास पांचशे पना दंड व्हावा व क्षत्रियांस एक हजार पना दंड व्हावा. ३७६
जर अशा क्षत्रियांने आणि वैश्याने एकाद्या उच्च कुलीन ब्राह्मणीशी अनैतिक नाते जोडण्याची हिम्मत केली तर त्या दोघांना शुद्राप्रमाणे शिक्षा करावी. म्हणजे सुक्या गवताच्या गंजीत बसवून जाळून टाकावे. ३७७
ब्राह्मणांने सुरक्षित ब्राह्मणीशी जबरदस्तीने सुत जमवले तर त्याला एक हजार पना दंड करावा. तिच्या संम्मतीने असेल तर पांचशे पना दंड करावा. ३७८
ब्राह्मणांना फाशी देता येत नाही कारण त्यामुळे वेदांचा अपमान होतो म्हणून त्याचं मुंडण करावे. इतर वर्णाच्या इसमांस त्याच्या गुन्ह्यासाठी शिरच्छेद करावा. ३७९
जरी ब्राह्मणाने कांहीही गुन्हा केला तरी त्याला मारता येत नाही म्हणून त्याला त्याच्या संपत्तीसह देशातून सहीसलामत हाकलून द्यावे. ३८०
क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

सोमवार, ४ मार्च, २०१९

हिंदू कोण – ६३

मागील भागातून पुढे –
१६. मृत्यू नंतरचे जीवन –
७७. माझी आई १९९० मध्ये दिवंगत झाली. त्या नंतर कांही महिन्यानंतर ती एकदा माझ्या स्वप्नात आली व म्हणाली, "अशोक मी येथे सुखरुप आहे परंतु एक अडचण आहे किं, येथे मला जेवणात मीठ मिळत नाही. तर तू मला मीठ दे." असें स्वप्न पडल्यावर मला जाग आली व ते स्वप्न मी चांगले आठवू शकलो. त्यानंतर मला झोप आली नाही. जागेपणी विचार करीत होतो किं, आता ह्या मृत आईस मीठ कसें द्यावयाचे? ह्या विषयाचा माझा अभ्यास बर्यापैकी असल्यामुळे माझ्या लक्षात आलें किं, जर मृतात्म्यास कांहीं द्यावयाचे असेल तर ते घराच्या खिडकीबाहेरील पट्टीवर ठेवावयाचे असते. कारण, भुते खिडकीच्या बारीवर बसून घरात डोकावून बघत असतात. ती सहसा घरात शिरत नाहीत. हे लक्षात आल्यावर दिवस उजाडण्याची वाट पहात तसांच पडून राहीलो. दिवस उजाडल्यावर मी प्रथम एक चमचा मीठ घेऊन स्वयंपाकघराची खिडकी उघडली, तो काय पहातो, खिडकीच्या बरोबर समोर असलेल्या एका मातीच्या ढिगार्यावर एक मोठा कावळा जणूकाय माझी वाट पहात बसल्या सारखा तयार होता. मी खिडकीच्या बाहेरील पट्टीवर मीठ ठेवतांच तो कावळा झपकन तेथे आला व ते मीठ चोंचेत घेऊन उडून गेला. त्यानंतर दररोज मी मीठ तेथे ठेवत होतो पण ते मीठ घेण्यासाठी कोणी कावळा आला नाही. त्यानंतर मी मीठ ठेवणे बंद केले. ह्याचा अर्थ एकदांच मीठ देण्यांने तिची गरज भागली होती, ह्याचा अर्थ हे मीठ मांगणे माझी मीठ देण्याची दानत पहाण्यासाठी होते. अशारितीने आपले पूर्वज आपली परीक्षा पहात असतात. त्यानंतर कोणी मला सांगितले किं, कावळा मीठ बिलकूल खात नाही म्हणून श्राद्धाच्या पिंडात मीठ जास्त असेल तर त्या पिंडाला कावळा शिवत नाही. म्हणून श्राद्धाच्या जेवणात मीठ घालू नये.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ६१ -७०
एकदा ताकीद दिली कीं, त्याने दुसर्याच्या बायकोशी बोलावयाचे नाही तरी तो बोलण्याचा प्रयत्न करतांना आढळला तर त्याला एक सुवर्ण एवढा दंड करावा. ३६१
हा नियम कलाकार, कलावंतीण वर्गातील सोकांना लागू होत नाही, कारण तेथे तसेंच जीवन असते. तसेंच जेथे बायकांचे राज्य आहे तेथेसुद्धा हा नियम लागू होत नाही. ३६२
असें असले तरी त्यांतील कोणी माणूस गुपचुप अशा बायकांशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असेल तिच्या इच्छेविरुद्ध तर तो शिक्षेस पात्र ठरतो. तसेंच स्त्री दासी, संन्यासिनी, ह्यांच्या संमतीशिवाय प्रयत्न करील तर तो त्या स्त्रिच्या तक्रारीनंतर दंडास पात्र ठरतो. ३६३
जो इसम कुमारिकेस तिच्या इच्छे विरुद्ध बळजबरी करतो त्यास देहदंडाची शिक्षा आहे. परंतु, जर ती कुमारिका राजी असेल तर तो शिक्षेस पात्र ठरत नाही. जर ते दोघेही एकाच जातीचे असतील. ३६४
जर कुमारिका तिच्या वरच्या जातीच्या पुरूषाशी प्रयत्न करत असेल तर त्या पुरूषास कांहीं दोष लागत नाही. परंतु, जर खालच्या जातीच्या पुरूषांवर प्रयत्न करत असेल तर तिच्या घरच्यानी तिला नजरकैदेत ठेवावे. ३६५
खालच्या जातीचा पुरूष जर वरच्या जातीच्या बाईशी प्रेम करत असेल तर त्याला देहदंडाची शिक्षा आहे. पण तो त्याच्या बरोबरीच्या जातीच्या मुलीशी प्रेम करत असेल तर त्याला तिच्याशी लग्न करावे लागेल. अर्थात् मुलीच्या घरच्या लोकांच्या परवानगीने. ३६६
जर कोणा पुरूषानी मुलीवर बलात्कार करून तिला नासवले तर त्याच्या हाताची दोन बोटे ताबडतोब छाटून टाकावीत. त्याशिवाय सहाशे पना दंड लावावा. ३६७
जो पुरूष मुलीच्या मर्जीने तिला नासवतो त्याला समाजात शिस्त रहावी अशा गोष्टी होऊ नयेत, म्हणून दोनशे पना दंड करावा पण त्याची दोन बोटे छाटली जाणार नाहीत. ३६८
एक कुमारिका दुसर्या कुमारिकेस समलिंगी करण्यास भाग पाडेल तर तिला त्या दुसर्या मुलीच्या लग्नाचा खर्च द्यावा लागेल व दोनशे पना दंड होईल. त्याशिवाय असें पुन्हा होऊ नये म्हणून तिच्या गुह्य भागावर दहा छड्या माराव्यात. समलिंगी संबंध करणार्या पुरूषांस देहदंड द्यावा. ३६९
जर मोठ्या बाईने लहान मुलीशी समलिंग केले तर मात्र तिचे मुंडम करावे त्याशिवाय तिच्या हाताची दोन बोटे छाटावीत आणि तिची गांवातून धिंड काढावी. ३७०
क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.