शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

चार वर्णांची माहिती


हिंदू समाजाच्या इतिहासानुसार हिंदू समाजाचे वर्णव्यवस्थेनुसार दोन प्रकार आढळून येतात. पहिला प्रकार वैदिक काळातील असून त्यानुसार वर्ण व्यवस्था माणसाच्या गुण कर्मानुसार ठरवली होती. त्यानंतरचा काळ आहे ज्याला ब्राह्मण काल म्हणतात, त्यात ही वर्ण व्यवस्था जन्मानुसार ठरवली जाऊ लागली. भगवद्गीता वैदिक काळातील असल्यामुळे तीत वर्णव्यवस्था गुणकर्मानुसार धरून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निरुपण केले आहे असें दिसते. मनुस्मृतीचा काल हा ब्राह्मण काल असावा कारण त्यात वर्ण व्यवस्था जन्मानुसार धरलेली आढळून येते. असे साधारणपणे समजतात किं, वैदिक काल सत्ययुगापासून द्वापारयुगाच्या शेवटच्या सत्रापर्यंत असून नंतर कलीयुगात ब्राह्मण काल सुरू होतो. म्हणजे मनुस्मृती कलीयुगाच्या प्रारंभ काळातील आहे असे दिसते. असें असले तरी फलज्योतिष शास्त्रानुसार माणसाचा वर्ण अजूनही वैदिक काळानुसारच सांगितला जातो. म्हणून जन्मपत्रिकेत अबकहडा चक्राच्या तक्त्यात वर्ण त्यानुसार दिलेला आढळतो.
हे चार वर्ण असें दिलेले आहेत, पहिला वर्ण आहे ब्राह्मण वर्ण, ह्याचा कर्ता अर्थातच ब्रह्मदेव म्हणजे प्रजापति असे समजतात. ह्या वर्णातील पुरुष बुद्धिजिवी समजला जातो. सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या शाखांत तो प्रवीण होणारा असावा अशी अपेक्षा असते. त्याशिवाय अध्यात्म साधनेत तो प्रवीण असावा लागतो. असें समजतात किं, वेद अशा ब्राह्मणांनी दिले आहेत. ही झाली वैदिक काळातील परिस्थिती. कलीयुगात मात्र परिस्थिती तशी राहीली नाही. कलीयुगातील ब्राह्मण बुद्धिजिवी असेलच असें नाही. बहुधा तो वैश्यप्रवृत्तिचा असल्याचे आढळते. वैश्य वर्णातील पुरुष व्यवहार चतुर त्याप्रकारच्या बुद्धिचा असतो तसेंच आजचे ब्राह्मण आहेत. ते तरीसुद्धा स्वताला ब्राह्मण जातीचे म्हणून सर्वोच्च असे समजतात. थोडक्यात कलीयुगातील ब्राह्मण वस्तुतः वैश्य असतो. ह्याचा दुसरा अर्थ असा होतो किं, कलीयुगात वैदिक योग्यतेचे ब्राह्मण नसतात. म्हणजे वस्तुतः कलीयुगात वैदिक योग्यतेचा ब्राह्मण वर्ण उरलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे कलीयुगात फक्त तीन वर्ण आहेत जे स्वताला ब्राह्मण म्हणून सांगतात ते खोटे ब्राह्मण असतात हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. गेल्या हजार वर्षांत अनेक वैश्य जातीच्या लोकांनी स्वतःला ब्राह्मण सांगण्यास सुरुवात केल्याची उदाहरणे आढळतात. ब्राह्मण सांगण्याचे अनेक फायदे असल्यामुळे हे झाले असावे. काही क्षत्रिय जातीचे लोकसुद्धा स्वतःला ब्राह्मण सांगू लागले अशारितीने सर्व समाजव्यवस्था अस्ताव्यस्त झाली. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात अशी आज परिस्थिती झाली आहे.
दुसरा वर्ण आहे क्षत्रियवर्ण. ह्या वर्णाचा पुरुष लढावू प्रवृत्तिचा असावा लागतो. त्याशिवाय तो ब्राह्मणासारखा बुद्धिमान असावा लागतो. शासन व्यवस्था सांभाळणे प्रसंगी स्वसंरक्षणासाठी युद्ध करणे अशी कामे त्याने करावी अशी अपेक्षा असते. क्षत्रियाची स्वाभाविक लक्षणे अशी सांगितलेली आहेत, तो आगाऊ प्रवृत्तिचा असतो. जर जमले तर मुद्द धरून आपली बाजू मांडतो कारण, त्याच्याकडे चांगली बुद्धिमत्ता असते, पण जर परिस्थिती उलटली तर तो मुद्द्यावरून गुद्द्यावर जाऊन शेवटी जिंकण्याचा प्रयास करतो. जिंकणे हे क्षत्रियाचे अंतिम ध्येय असते. बर्याच वेळा अशा वागण्यामुळे क्षत्रिय पुरुष, समाजातील शांतताप्रेमी लोकांना त्रासदायक वाटतात. मानवधर्म शास्त्रानुसार क्षत्रियांचे दोन प्रकार दिले आहेत. एका प्रकाराला कुलीन क्षत्रिय दुसर्या प्रकाराला भ्रष्ट क्षत्रिय असें दिले आहेत. कुलीन क्षत्रिय मर्यादा पुरुष असतात ते कधीही अयोग्य ठिकाणी आगाऊपणा करीत नाहीत. ते आदर्श क्षत्रिय असतात समाजाला त्यांचा आधार वाटतो. त्यांच्या सहवासात कमजोर, वृद्ध, स्त्रिया, लहान मुलं आणि शरणागत लोक स्वताला सुरक्षित समजतात. ते गीतेत सांगितलेल्या दैवी संपदाचे उदाहरण असतात. त्याउलट भ्रष्ट क्षत्रियांचे असते. ते गीतेत दिलेल्या आसुरीसंपदाचे मूर्तीमंत स्वरूप असतात. आपल्या ताकदीचा गैरवापर करणे, अत्याचार करणे अशी त्यांची तर्हा असते. कमजोर, वृद्ध, स्त्रिया, लहान मुलं आणि शरणागत लोक स्वतःला त्यांच्या सहवासात असुरक्षित समजतात. थोडक्यात हल्ली जे लोक मवाली म्हणून ओळखले जातात ते भ्रष्ट क्षत्रिय प्रकारातील असतात. वैदिक काळातील ब्राह्मण काळातील सर्व क्षत्रिय तसेंच आहेत म्हणजे ब्राह्मणांत जसा फरक झाला त्याप्रमाणे ह्यांत फरक झालेला नाही.
तिसरा वर्ण आहे वैश्यवर्ण. वैश्यवर्णाचा पुरुष व्यवसाय, धंदा, शेती अशी कामे करून जगतात. समाजाची अर्थ व्यवस्था ते सांभाळतात. वैदिक काळातील ब्राह्मण काळातील वैश्यांत कांहींही फरक आढळत नाही. आपली कामे करण्यासाठी जेवढी बुद्धि आवश्यक असते तेवढी बुद्धि त्यांच्याकडे असते. व्यवहार चातुर्य ज्याला हल्ली स्मार्टपणा म्हणतात तो ह्या वैश्यात भरपूर असतो. स्मार्टपणा हा वैश्याचा मुख्य गुण असतो.
शेवटचा वर्ण आहे शुद्रवर्ण. ज्याला वर दिलेली कोणतीही कामे स्वतःच्या हुशारीने करता येत नाहीत असा पुरुष शुद्र समजला जातो. शुद्र पुरुष त्यामुळे सेवकांचे काम करतो. वैदिक काळात असें जरी प्रथमदर्शनी सांगितले जात असले तरी ब्राह्मणकाळात स्वतःला ब्राह्मण म्हणून उच्च समजणारे समाजातील श्रेष्ठी महाजन मंडळी ह्यांच्या रोषाला अनेक बळी पडलेले लोक जे वस्तुतः वर्णांने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातील होते तरी ते श्रेष्ठींच्या आज्ञेने शुद्र ठरवले गेले. असे खोटे शुद्र, खोटे म्हणण्याचे कारण, ते लोक कर्तृत्ववान असूनही शुद्र ठरवले गेल्यामुळे आपल्या हक्कास मुकलेले असतात. ब्राह्मण काळात हे फार झाले समाज व्यवस्था बिघडली आणि हिंदू समाजव्यवस्था उध्वस्थ झाली. जसें कर्तृत्ववान लोक शुद्र ठरवले गेले तसेंच कांहीं नालायक लोक केवळ वशिल्याने लायकी नसतांना ब्राह्मण क्षत्रिय वर्णांत गणले जाऊ लागले. आज हिंदूस्थानातील अनेक शुद्र मुळचे क्षत्रिय असल्याचे संशोधनानंतर सिद्ध झाले आहे. दोन हजार वर्षे होत असलेल्या अशा गैरव्यवहारामुळे हिंदू समाज आज विषण्णावस्थेत गेला आहे.
स्त्री हा समाजातील अर्धा भाग ह्या वर्ण व्यवस्थेत सुरुवातीपासून दुर्लक्षिला गेला आहे. वैदिक काळात स्त्रीस विशेष स्थान होते असे सांगतात पण ब्राह्मण काळात तिची परवड झालेली आपण पहात आहोत. मनुस्मृतीत स्त्रीस शुद्राचा दर्जा देऊन तिचा घोर अपमान केलेला आहे.
आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लोक १२५ - १४ वाचू या.
देवांसाठी दोन ब्राह्मण पितरांसाठी तीन ब्राह्मणांस जेवणासाठी बोलवावे. जास्त बोलवू नयेत. कारण श्रीमंत यजमानालासुद्धा ते परवडणारे नसते. १२५
विनाकारण जास्त ब्राह्मणांना बोलवल्यामुळे अनेक प्रश्र्न उत्पन्न होतात जसें, व्यवस्थापन नीट होत नाही. त्यामुळे अनेकांची नाराजी ओढवून घेतल्यासारखे होते. त्यासाठी नेमके ब्राह्मण बोलवावेत. जर येथे दिल्याप्रमाणे बोलवणे परवडत नसेल तर फक्त प्रत्येकी एकच ब्राह्मण बोलवावा. १२६
अन्वहार्य विधी पूर्वजांच्या कल्याणासाठी प्रसिद्ध आहे. हा विधी महिन्याच्या प्रतिपदेस (म्हणजे पहिल्या तारखेस) करावयाचा असतो. हा विधी आदिदैवतांना उद्देशून दिला आहे. हा विधी स्मार्त नियमांनुसार फार काळजीपूर्वकपणे करावा लागतो. म्हणून फक्त हुशार ब्राह्मणांकडूनच करावा. १२७
ह्याविधीचे पौरोहित्य श्रोत्रिय ब्राह्मणांनेच करावे. जर योग्य पुरोहितांने ते केले तर यजमानाला मोठा फायदा होतो. १२८ टीपः श्रोत्रिय ब्राह्मण म्हणजे असा ब्राह्मण जो यज्ञकुडा समोर बसून यज्ञ करण्याचे शिक्षण घेऊन प्रशिक्षित झाला आहे.
वेदाचे ज्ञान नसलेल्या अनेक ब्राह्मणांना जेवण देण्यापेक्षा दोघांच (प्रत्येकी एक, देव आदिदैवत, म्हणजे पितर) जाणकार ब्राह्मणांना बोलावून हा विधी (यज्ञ करून) केला तर देव पितर दोघेही संतुष्ट होतात. १२९
उच्च कुळातील स्मार्त विधीचे संपूर्ण ज्ञान असलेला ब्राह्मण मुद्दाम चौकशी करून शोधून आमंत्रित करावा त्याला देव पितर ह्यांचा प्रसाद अतिथी म्हणून खावयास द्यावा. तसें केल्याने उत्तम फळ मिळते. १३०
अनेक अज्ञानी ब्राह्मणांना जेवू घालण्यापेक्षा एकाच वेदाचे योग्य ज्ञान असलेल्या ब्राह्मणाला जेवू घातले तर ते आध्यात्मिक दृष्ट्या जास्त चांगले असते. १३१
जे खाणे पितर देव ह्यांना आवडते ते वेदाच्या ज्ञानाने ख्यातनाम झालेल्या ब्राह्मणांस जेवणात द्यावे कारण, रक्तांने माखलेल्या हातांने रक्तांचे डाग पुसता येत नाही. १३२ टीपः रक्ताने माखलेले हात म्हणजे अज्ञानी ब्राह्मण, रक्तांचे डाग म्हणजे माणसांने केलेली पापं असा समजावा. ह्याचा अर्थ माणसांने जी कृष्णकृत्ये (पापकर्म) केलेली असतील ती धुवून टाकण्यासाठी ज्ञानी माणसालाच देव पितर ह्यांना विनंति करण्यास सांगावे लागते. म्हणजे हे सर्व विधी यजमानाच्या पापमुक्तीसाठी देव पितर इत्यादिंना विनंति करण्यासाठी असतात.
जेवढे घास अज्ञानी ब्राह्मण खाईल तेवढ्या तापलेल्या लोखंडी सळ्या यजमानाला त्याच्या मृत्यूनंतर खाव्या लागतात. १३३ टीपः म्हणून अज्ञानी ब्राह्मणास बोतवू नये.
कांहीं ब्राह्मण केवळ ज्ञानासाठी असतात तर कांहीं व्रतवैकल्ये करण्यासाठी असतात. इतर कांहीं वेदांचे वाचन करण्यासाठी असतात. उरलेले कांहीं वेदांतील पवित्र यज्ञयाग (हे श्रोत्रि) करण्यात घालवतात. १३४ टीपः स्मार्त ब्राह्मण ह्यांहून वेगळे आहेत.
पितरांसाठीची आहुती (प्रसाद देणे) सावधगिरीने ज्ञानी माणसांस करावी परंतु, देवांची आहुती पवित्र नियमांनुसार चारही वर्णाच्या लोकांसाठी करावयाची असते. १३५ टीपः म्हणजे देवांसाठी ब्राह्मण जर नाही मिळाला तर क्षत्रिय अथवा वैश्य तोही नाही मिळाला तर शुद्र बोलवावा.
समजा, वडील वेदांबद्दल अज्ञानी आहे मुलगा वेद आणि अंगांबद्दल जाणकार आहे, दुसरे उदाहरणांत वडील ज्ञानी परंतु मुलगा अज्ञानी आहे अशी दोन उदाहरणे पाहूया. १३६
पहिल्या उदाहरणांत मुलांस त्याच्या ज्ञानाबद्दल योग्य मान मिळावा पण वडीलांना मान मिळणार नाही. दुसर्या उदाहरणांत वडीलांच्या ज्ञानांमुळे त्याचा मुलगासुद्धा आदरणीय ठरतो. १३७
अंत्यविधीच्या वेळी स्वतःच्या खाजगी मित्रांची उठबस (श्राद्धाच्या जेवणाच्या प्रसंगी) करू नये. त्या ऐवजी अशा मित्रांचा इतर प्रकारे इतर काळी सन्मान करावा. श्राद्धाच्या वेळी फक्त ब्राह्मणांस जेवण वाढावे जो मित्र नाही आणि शत्रूही नाही. १३८
श्राद्धापासून मिळणारे मृत्युनंतरचे फायदे त्या यजमानाला मिळत नाहीत जो मित्र मिळविण्यासाठी ते विधी करतो. १३९
श्राद्धाच्या निमित्ताने मित्र जमवणारा द्विज (ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य असे तिघेही) मृत्युनंतर स्वर्गात जात नाही, तो नीचांत अतिनीच ठरतो. १४०
श्राद्धाच्या वेळी द्विजांने दिलेले जेवण मित्रमंडळींबरोबर खाल्यांने ते अन्न पिशाच्चांना जाते, आणि तो द्विज एकादी आंधळी गाय जशी कुरणांत भटकते तसा भटकत राहतो. त्याला मुक्तीचा मार्ग सांपडत नाही. १४१
श्राद्धाचे जेवण अज्ञानी (वेदांच्या ऋचा माहीत नसलेला) माणसास दिल्यांने असें होते जसें नापीक जमिनीत पेरणी करावी. १४२
योग्य ज्ञानी माणसास श्राद्धाचे जेवण दिल्यांने देणारा घेणारा अशा दोघांचा फायदा होतो. जीवनांत तसेंच मृत्यू नंतरसुद्धा फायदा होतो. १४३
जर योग्य ज्ञानी माणूस उपलब्ध नसेल तर सत्शील मित्रांस जेवणांस बोलवावे परंतु, ज्ञानी शत्रूस जेवण देऊ नये. कारण असे जेवण कांहीं उपयोगाचे नसते. १४४


पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com
आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.