शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

हिंदू कोण – ४२

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
खाटीकांत प्राण्याला जीवे मारणारा व नंतरची कामे करणारा असें दोन असतात. त्यातील जीवे मारणारा विनावेदना मारण्याच्या तंत्रात प्रशिक्षित असावा म्हणजे हिंसा टाळता येईल. इस्लाम मध्येसुद्धा जीवे मारणारा मौलवी असावा लागतो कारण त्या धर्मातसुद्धा प्राण्याचा मृत्यू विनावेदना झाला पाहिजे असा दंडक आहे. तो मौलवी मारतांना अल्लाह कडे क्षमा मागणारी आयता बोलतो व नंतर ती हत्त्या त्याच्या कुवतीनुसार करतो पण आज तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे किं, हे कार्य पूर्णपणे विनावेदना करणे शक्य झाले आहे. त्यामुळे तो प्रश्र्न आता रहात नाही. मनुस्मृतीतसुद्धा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांनी बळी द्यावेत असें सांगितले आहे ते ह्यांच कारणांने असावे असें वाटते. एका उपनिषदात एक तपस्वी एका खाटकाचे काम करणार्या ज्ञानी ऋषीस विचारतो, "हे प्राणी मारण्याचे काम तुम्ही कां करता"? त्यावर तो ऋषी सांगतो, "मी हे प्राणी विनावेदना मारतो, जर ते मी नाही केले तर कोणी अज्ञानी ह्या प्राण्यांना सवेदना मारील ते होऊ नये म्हणून मी हे काम करीत आहे. निसर्गाने माणसाला उभयाहारी केले असल्याने मांसाहार करणे माणसांस बंधनकारक आहे तसें न करणे पापकारक आहे".
६१. निसर्गाचा गाडा सुरळीतपणे चालण्यासाठी आधी जन्मलेले जीव मरणे क्रमप्राप्त असते. त्यासाठी संत पीटरला एक साक्षात्कार झाला होता त्याची गोष्ट पहावी लागेल. येशुचा संदेश पसरवण्याचे काम करतांना संत पीटर गांवेगांवी भटकत होता. त्याला लोक प्राणी मारून खातात हे अयोग्य वाटल्याने त्याने त्याच्या अनुयायांना मांसाहार न करण्यास सांगितले. असेंच एकदा तो एका गांवी दुपारी ध्यानस्थ बसला असतां, त्याला साक्षात्कार झाला. त्याला त्यात एक सफेद चादर आकाशातून खाली जमिनीवर येतांना दिसली. त्या चादरीवर सर्वप्रकारचे खाद्य प्राणी फिरत होते. पीटरला त्या साक्षात्काराचा अर्थ समजला नाही. तो परमेश्र्वराला विचारतो, "हे काय प्रभू", त्यावर आकाशातून आवाज आला किं,
"हे सर्व प्राणी माणसांने खावयाचे असा आदेश आहे कारण, मनुष्य हा देवांने उत्पन्न केलेला एक मोठा भक्षक प्राणी असून त्याचे काम हे प्राणी खाऊन त्यांची भरमसाटपणे वाढणारी संख्या नियंत्रित करावयाची असें असते. निसर्गातील प्रत्येक प्राण्यास कांहीं काम नेमून दिले आहे व माणसांस जी अनेक कामे दिली आहेत त्यातील हे एक आहे. अर्थात्, खाण्याशिवाय इतर कारणांने जर त्यांने प्राणी मारले तर ते मात्र पाप ठरेत. खाण्यासाठी मारले तर ते पाप ठरत नाही म्हणून तू व तुझे अनुयायी ह्यापुढे मांसाहार करतील".
त्या साक्षात्कारा नंतर पीटरने त्याच्या अनुयायांस मांसाहार करण्यास सांगितले.

६२. मनुस्मृतीतसुद्धा तशाच स्वरुपाचा आदेश दिला आहे. कोणी कोणाला खावयाचे ह्याबद्दल तेथे सुचना आहेत. जीवो जीवस्य जीवनम्, हे तत्त्व हिंदूंनी स्वीकारलेले आहे. येथे मी संत पीटरची गोष्ट सांगितली कारण आपण हिंदू, जगातील सर्वच संतांचा आदर करतो व त्यांची शिकवण विचारात घेण्यास मोकळे आहोत. अनेक विविध विचार आत्मसात करणे हा हिंदूंचा हक्क आहे. केवळ भारतीयच सूत्रातून विचार आला तर तो स्वीकारावयाचा एरवी नाही असें हिंदू मानत नाहीत. म्हणूनच अल्लाह व येशू ह्यांना आपण उत्क्रांतवादी हिंदू सन्मानाने वागवतो. ब्राह्मणांना ते शक्य नसते. त्यांच्यातील मांगासलेपणा त्यांना ते करू देत नाही. अशा गोष्टी ते प्रतिष्ठेच्या करतात. आतापर्यंत अनेक पंथ व धर्म, हिंदूंनी आत्मसात करून हिंदू परंपरेत समाविष्ट केलेले आहेत. असेंच एक दिवस येईल, जेव्हां ईस्लाम व ख्रिस्ती, हिंदूंत विरघळून समाविष्ट झालेले दिसतील तेव्हां आश्र्चर्य वाटावयाचे कारण नाही. कारण, हिंदू परंपरा मुलतः सर्वग्राही आणि अनंत आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी किं, ब्राह्मणांच्या हस्तक्षेपामुळे हिंदूंची ही शक्ति आज काम करीत नाही.
मनुस्मृतीच्या पांचवा भागांत ब्राह्मणांनी मांसाहार करण्याबाबतची जी माहिती आहे ती अशी,
अशारितीने द्विजांनी कोणते व कसें खावे ते सविस्तरपणे पाहिले. आता खाण्याचे नियम व मांस खाणे केव्हा टाळावे ते पहावयाचे आहे. २६:
मांस (मिठाच्या) पाण्याने शिंपून शुद्ध केल्यावर खाण्यास योग्य होते. ते करतांना मंत्राने तो विधी संपन्न करावा. तसेंच जेव्हां ब्राह्मणाला मांस खाण्याची इच्छा होईल, मंत्रविधीपूर्वक यज्ञ करतांना व प्रकृती सुधारण्यासाठी त्यांने मांसाहार करावा. २७ :
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – -
परिणामतः जर राजाने जे करू (घेऊ) नये ते केले (घेतले) व जे करावयास (घ्यावयास) पाहिजे ते केले नाही तर तो कमजोर समजला जातो व ह्या जगात आणि नंतरच्या जगात सुद्धा नष्ट होईल. १७१
राजाने आपला हक्क घेऊन वर्णातील भेदांचे स्तोम न वाजवता सर्वांचे संरक्षण केले तर तो समृद्ध होईल आणि मृत्यू नंतर सुखात राहिल. १७२
यमदेवाप्रमाणे, राजाने आपल्या आवडी नावडीची विशेष दखल न घेता क्रोधावर नियंत्रण ठेवून काम केले पाहिजे. १७३
परंतु, जो राजा दुष्ट बुद्धीने जाणून बुजून चुकीचे निर्णय घेतो आणि अन्याय पसरवतो तो शत्रू कडून लवकरच हरवला जातो. १७४
प्रेम आणि हेवा ह्यांच्या मध्ये न फसता जो राजा न्यायबुद्धीने राज्यकारभार चालवतो तो प्रजेचे मन जिंकतो, ती त्याच्या जवळ जाते जसें नदी समुद्राकडे जाते. १७५
ऋणकोने राजाकडे तक्रार केली कीं, त्याचा धनको राजाच्या आज्ञेबाहेर जाऊन वसुली करतो तर राजा त्याला मुद्दलाच्या चौथा भाग एवढा दंड करील आणि धनको त्यांचे मुद्दल परत करील. १७६
ऋणको जर धनकोच्या वर्णाचा अथवा खालच्या वर्णाचा असेल तर तो कर्जाची परतफेड मेहनत घेऊन करू शकतो परंतु, उच्च वर्णाचा असेल तर मात्र सावकाशपणे तो ती परतफेड पैशानेच करील. १७७
नियमानुसार राजा समबुद्धीने लोकांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न साक्षी पुराव्यांच्या मदतीने करील. १७८
शहाणा माणूस त्याची ठेव चांगल्या कुटूंबातील, चांगली वर्तणूक असल्ल्या, कायदे जाणणार्या, सज्जन, चांगल्या परिवारातील असलेल्या, प्रतिष्ठीत (आर्य) माणसाकडे ठेवील. १७९
ज्या स्वरुपात ठेव दिली असेल त्याच स्वरुपात ती परत केली गेली पाहिजे. १८० टीपः पैसे असतील तर पैसे, गाय असेल तर गाय असें परतफेडले पाहिजेत.

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू –
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.    

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

हिंदू कोण – ४१

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
६०. शाकाहाराचे खुळ प्रथम जुनाट जैन प्रणालीत सुरु झाले. जैन प्रणाली अहंकारावर अवलंबून आहे. मांसाहारास विरोध सुरु झाला कारण, असा एक गैरसमज पसरवण्यात आला किं, मांसाहार करण्यासाठी प्रथम त्या प्राण्याची जी हत्या करावी लागते त्या हत्येत हिंसा असतें. जैन तत्त्वज्ञाना प्रमाणे, हिंसा करणे पाप समजले जाते. जैन तत्त्वज्ञानात कोठेही हत्या करू नये असे सांगितलेले नाही फक्त हिंसा न करण्याचा संकल्प असतो. तसेंच मांस खाऊ नये असेही सांगितलेले नाही. परंतु, हिंसा केल्याशिवाय हत्या होत नाही असा एक गैरसमज होता व हिंसा आणि हत्या ह्यातील फरक लक्षात घेतला गेला नाही. एका दृष्टीने ते बरोबर होते कारण, त्या काळात विनावेदना हत्या करणे आजच्या सारखे शक्य नव्हते. त्याकारणांने हत्या व हिंसा हे समान समजले गेले. बदलत्या काळात व विज्ञानाच्या प्रगतीमुळे विनावेदना हत्या करणे शक्य झाले आहे. म्हणजे, एकवीसाव्या शतकांत हत्या व हिंसा हे एकच राहिलेले नाहीत. म्हणजे अगदी जैन विचारांनुसारसुद्धा विनावेदना हत्या पाप ठरत नाही. हिंदू सर्व प्रकारच्या हिंसांना पाप समजत नाहीत हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. कारण, हिंदूंच्या विचारानुसार जर हिंसा अध्यात्मिक र्हासास कारण होत नसेल तर ती हिंसा पाप ठरत नाही व म्हणून ती हिंसा करण्यास हरकत नसते. हिंसा करण्याची इच्छा नसतांना इतर कारणांमुळे हिंसा झाली तर ती हिंसासुद्धा पाप ठरत नाही. उदाहरणार्थ, खाटीक हिंसा करतो पण ती हिंसा त्याला करण्याची इच्छा नसते केवळ एक कर्तव्य म्हणून तो ती नाईलाजाने करीत असतो म्हणून अशा हिंसेला पाप समजले जात नाही. दुसरे उदाहरण युद्धात लढणार्या योद्ध्याचे घेता येईल. तो युद्धात अनेकांना ठार मारतो पण त्या सर्व हिंसा करण्याचा त्याचा उद्देश नसतो. गीतेत श्री कृष्णानी त्याच कारणांने अर्जुनांस युद्ध करण्याचा आदेस दिला आहे. रस्त्याने चालतांना अनेक छोटे प्राणी मारले जातात, श्र्वासोंश्र्वास करतांना असंख्य सुक्ष्म जीव मारले जातात, त्यांत हिंसा करण्याचा उद्देश नसतो म्हणून त्यांमुळे पाप लागत नाही. आजारी माणसास बरे करण्यासाठी शरीरातील लक्षावधी रोगजंतु मारावे लागतात त्यांत हिंसा करण्याचा उद्देश नसतांना जर हिंसात्मक हत्या झाली तरी ती पाप ठरत नाही. विशेष म्हणजे, हिंसा करण्याचा उद्देश आहे व मनांने ती हिंसा केलीसुद्धा परंतु, प्रत्यक्ष हिंसा जरी झाली नसली तरी ते पाप ठरते. पापाचा उद्देश हा प्रमुख मुद्दा असतो हे पहाता, जर पाप होत नसेल तर अगदी सवेदना हत्या सुद्धा झाली तरी हरकत नसते. निसर्ग सतत हिंसात्मक हत्त्या करीत असतो कारण हत्या झाल्याशिवाय जीवनक्रम चालू रहात नाही. पण त्याचा उद्देश हिंसा करण्याचा नसल्यामुळे त्या हिंसा वैध ठरतात. हा जैन व हिंदू विचारांतील महत्वाचा फरक आहे. गीतेतील विवेचनानुसार माणूस कधीही कोणाचीही हत्या करू शकत नाही. तो केवळ कारणमात्र असतो. एकादी गोष्ट पापकारक आहे कीं नाही ते ठरवण्यासाठी, हिंदूंत उद्देश काय आहे, ते महत्वाचे समजतात परंतु, जैन कृती (उद्देश असो अगर नसो) महत्वाची समजतात. अशा कारणांने जैन विचार हिंदूंच्या मानाने निकृष्ट ठरतो. शेवटी हिंसा अथवा अहिंसा ह्याचा संबंध पाप पुण्याशी आहे व जर पाप होत नसेल तर ती हिंसा वैध ठरते हे लक्षात घेतले पाहिजे. ह्यांत आणखीन एक प्रश्र्न पुढे येतो तो असा की, हिंसात्मक हत्या जीव करतो किं, आत्मा करतो? जर त्या क्रियेत जीवाबरोबर आत्मा सामील असेल तरच ते कृत्य आत्म्यास बाधते, एरवी नाही कारण, जीवाला पाप व पुण्य दोन्हीही लागू होत नाहीत कारण जीव हे एक रासायनिक तत्त्व आहे. ह्याच कारणांसाठी इतर मांसाहारी प्राणी जी हिंसात्मक हत्त्या करतात त्यामुळे त्यांत पाप नसते कारण त्या प्राण्यात आत्मा नसतो. ह्या वरून खाटीक व योद्धा हिंसात्मक हत्त्या करूनही निष्पाप रहातात त्याचे कारण समजते तें असें, त्यांचे जीव ते करीत असतात व त्यांचा आत्मा त्या हिंसाचरात गुंतलेला नसतो. दुसर्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनास म्हणजे त्याच्या जीवांस युद्ध करण्यास सांगितले व त्याच्या आत्म्यास मात्र त्या पासून विमुक्त रहावे असें सांगितले आहे. गीतेत श्रीकृष्ण कोणता सल्ला अर्जुनाच्या जीवाला देतो व कोणता त्याच्या आत्म्याला देतो हे तपासले तर एक वेगळी गीता दृष्टोत्पत्तीस येते.
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – १६१ -१७०
हमीदार मेला आहे व सर्व इतर गोष्टी माहित आहेत अशा परिस्थितीत धनको कर्ज काढणार्याच्या मुलाकडून वसुली करण्याचे अधिकार मिळवू शकतो. १६१
जर हमीदाराने ऋणकोकडून सर्व रक्कम वसुल केली आहे आणि त्याच्याकडे परतफेड करण्याची पुरेशी ताकद आहे असें असेल तर, त्याच्या वारसांने ते कर्ज व त्यावरील व्याज फेडले पाहिजे असा सर्वमान्य नियम आहे. १६२
व्यसनी, वेडा (भ्रमिष्ट), दुर्धर रोगांने पिडलेला, परावलंबी, लहान मुलगा, अतिवृद्ध माणूस, आणि अलधिकृत माणसें अशांनी केलेला करार मान्य होणार नाही. १६३
सर्वमान्य मुल्ये व प्रस्थापित नियम ह्यांच्या विरुद्ध असें नियम अटी असलेला करार (सिद्ध झाला तरी) अवैध समजला जाईल व त्याची अंमलबजावणी होणार नाही. १६४
फसवणूक आहे असें गहाणपत्र,भेटवस्तु, किंवा कोणतेही करार अवैध प्रकारचे केलेले न्यायालयापुढे सिद्ध झाले तर तो सर्व व्यवहार बाद ठरतो. १६५
ऋणको मेला आहे परंतु, त्याने काढलेल्या कर्जाचा उपभोग त्याच्या नातेवाईकांनी घेतला आहे असें स्पष्टपणे सिद्ध झाले तर ते कर्ज व्याजासकट फेडण्याची जबाबदारी त्या नातेवाईकावर पडते. १६६
कुटूंबावर अवलंबून असलेल्या माणसांने जर कुटूंबासाठी कर्ज काढले असेल तर त्याची भरपाई त्या कुटूंबाच्या प्रमुखास जरी तो परदेशी असला तरी घ्यावयाची असते. १६७
जबरदस्तीने केलेले करारनामे, व्यवहार, मनुने सर्वस्वी अवैध ठरविले आहेत. १६८
तीन माणसांचे नुकसान एका माणसाच्या चुकीमुळे होत असते ते साक्षीदार, हमीदार व न्यायाधीश आहेत तसेंच त्यामुळे फायदा होत असतो चार जणांचा ते आहेत, ब्राह्मण, व्यापारी, सावकार व राजा! १६९
राजाने जे प्रजेकडून घेऊ नये ते त्यांने कधीच घेऊ नये व जे त्यांने घेतले पाहिजे ते त्यांने घेतलेच पाहिजे, मग त्या गोष्टी किती मोठ्या आहेत अथवा लहान आहेत ते महत्वाचे नसते. १७०
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.