रविवार, ३० डिसेंबर, २०१८

हिंदू कोण – ६१

मागील भागातून पुढे –
१६. मृत्यू नंतर चे जीवन –

७५. माणसाला त्याचा मृत्यू काळ समीप आल्याचे समजू शकते. साधारणपणे पन्नाशी नंतर त्याने आपल्या मृत्यूची व्यवस्था करणे श्रेयस्कर असते. मृत्यूच्या अवस्थेची व्यवस्था म्हणजे काय ते पहावे लागेल. माणसाला बहुधा कांहीं कांहीं व्यसन अथवा वाईट सवयी असतात. त्या सर्व व्यसनांचा वाईट सवयींचा त्याने पूर्णपणे त्याग करावयाचा असतो. असे करण्याचे कारण, मृत्यूनंतर त्याला देह रहात नाही ही सर्व व्यसने वाईट सवयी ह्या देहाच्या माध्मानेच होत असतात, ते पहाता मृत्यूनंतर देह नष्ट झाल्यामुळे त्या सर्व गोष्टी त्याच्या प्रेतात्म्यास फार पिडा देऊ लागतात. मेल्यानंतरसुद्धा त्या वासना त्याच्या आत्म्याला सोडत नाहीत. कारण, हि सर्व लिंगदेहात नोंदलेली असतात. जीव देह दोन्ही नसतात लिंगदेह त्या वासनांची आत्म्याला सतत आठवण करून देत रहातो. देह नसल्यामुळे वासनांचे उपशमनसुद्धा होऊ शकत नाही त्या वासना त्या प्रेतात्म्यास नरक यातना भोगावयास लावतात. मृत्येनंतर पुढील जन्म केव्हा मिळेल त्याची शाश्वती नसते. त्यामुळे अशा यातनामय अवस्थेत तो प्रेतात्मा त्या नरक यातना भोगत अनेक वर्षे तडफडत रहातो. हे टाळण्यासाठी माणसांने जीवनाच्या अंतकाळी तरी निदान निर्व्यसनी असणे त्याच्या मृत्यू नंतरच्या आयुष्यासाठी आवश्यक असते. दैहिक व्यसनांत, दारु, वीडी सिगरेट, गांजा, अफु, तंबाखू, सुपारी, जुगार खेळणे, वेश्यागमन अथवा संभोगाचे व्यसन इत्यादि येतात. अशा व्यसनांमुळे ते पुरुष अशुद्ध ठरतात. स्त्रीस ही दैहिक व्यसने बहुधा नसतात. ह्यांबाबत त्या बहुधा शुद्ध असतात. मानसिक व्यसनांत मात्र पुरुषांपेक्षा स्त्री जास्त अडकलेली असल्याचे आढळून येते. मानसिक व्यसने अशी, सतत काळजी करीत रहाणे, दुःखी रहाणे, संशय घेत रहाणे, काल्पनिक चिंतेत रमणे, रडणे, भांडखोरपणा, मत्सर करणे, जर स्त्री ह्या मानसिक व्यसनातून मुक्त झालेली नसेल तर त्या स्त्रीचे मृत्यूनंतरचे जीवन नरकासमान असेल. पुरुषाला ही मानसिक व्यसनेसुद्धा सतावत असतात. वस्तुतः जीवनाच्या सुरुवातीपासूनच माणसांने कोणत्याही व्यसनांत स्वताला गुंतवून ठेवू नये. हे साध्य होण्यासाठी वयाच्या चाळीशीपासूनच स्वताची व्यसनमुक्ति करण्यास सुरुवात करावी. ज्यांना असें कोणतेही व्यसन नाही असें लोक मृत्यूनंतर शांत आरामशीर राहू शकतात. त्यांचे मृत्यूनंतरचे जीवन सुखकर रहाते. भावनाविवश होणारी माणसे व्यसनात सांपडतात.
छंद व्यसन ह्यातील फरक समजून घ्यावा लागेल. छंद माणसाला त्याचा काळ मजेत घालवण्यास मदत करतात. त्यांचा नाद मात्र नसावा. छंदात अनेक चांगल्या गोष्टी येतात. वाचन, लिखाण करणे, विविध खेळ खेळणे, प्रवास करणे, कांहीं वस्तु जमवणे असें विविध छंद माणूस आपल्या जीवनात वाढवतो. तेसुद्धा जर नाद झाले तर तेसुद्धा मृत्यूनंतर त्रासदायक ठरू शकतात. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे, माणसांनी आपल्या सर्व सवयी मर्यादीत अवस्थेत ठेवाव्यात. कारण, अशा अवस्थेत अडकलेल्या माणसाच्या प्रेतात्म्यास कोणीही मदत करू शकत नाही. ध्यान-जप करण्याचा छंद मात्र ह्याला अपवाद आहे.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू -
प्रवास करणार्या द्विजाने जर भूक लागली म्हणून शेजारच्या शेतातून ऊसाचे कांड किंवा कंदमुळं काढून घेतली तर ती चोरी समजली जाणार नाही. परंतु. शूद्राने तसे केले तर ती चोरी समजावी. ३४१
जर कोणी बांधलेला घोडा (जनावरं) सोडला अथवा सुटा घोडा (जनावरं) बांधला तसेंच गुलामाबाबत केले तर तो चोरीचा गुन्हा ठरतो. ३४२
जो राजा नियमांनुसार चोरांना शिक्षा करेल त्याची ख्याती सर्वत्र पसरेल व मरणानंतर त्याची वाहवा होईल. ३४३
ज्या राजाला इंद्राचे स्थान मिळवावयाचे आहे तो कधीही हिसा करणार्यास क्षमा करणार नाही. ३४४
हिंसा करणारा चोरापेक्षा, बदनामी करणार्यापेक्षा, दुसर्याला काठी मारून इजा करणार्यापेक्षा, जास्त मोठा गुन्हेगार समजला जातो. ३४५
जो राजा हिंसा करणार्याला माफ करतो, त्याचा लवकर नाश होतो आणि तो सर्वांच्या द्वेषास पात्र होतो. ३४६
राजाने मैत्रीसाठी, पैशासाठी, हिंसा (अत्याचार) करणार्याला क्षमा करून सोडून देऊ नये. कारण तो गुन्हा समजला जातो. ३४७
जेव्हां द्विजावर, त्याच्या जातीवर हिंसक आपत्ती कोसळते, त्याच्या कामात हिंसक विघ्न आणले जाते तेव्हां, त्याने त्याच्या जातीच्या संरक्षणासाठी शस्त्र हाती घ्यावयाचे असते. तो गुन्हा होत नाही. ३४८
स्वसंरक्षणार्थ, बायकामुलांच्या संरक्षणार्थ, ब्राह्मणाच्या संरक्षणार्थ, जर शस्त्र हाती घेतले तर त्यात पाप नाही. तो क्षत्रिय समजला जाईल, जरी शूद्र असला तरी. ३४९
खून करण्याच्या उद्देशाने जर कोणीही जसें शिक्षक, मुलगा (पुत्र), वृद्ध किंवा वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण, अंगावर आले तर त्याचा वध करणे हिंसा समजली जाणार नाही. ती अहिंसाच समजावी. कारण त्यात अत्याचार होत नाही. ३५०
क्रमशः चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.