सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

हिंदू कोण – ६

. हिंदू मान्यतेतील देव परमेश्र्वर ह्यां बद्दलच्या कल्पना - (पुढे चालू)
. शेवटी आपण ह्या चार प्रकारात येणार्या विविध देवतांची हल्ली माहीत असलेली नांवे उदाहरणा करतां पाहूया. वैदिक काळात जी नांवे प्रचलित होती ती आज प्रचारात नाहीत. ईश्र्वर वर्गात येणारी दैवते अशी, ब्रह्मदेव, सत्यनारायण, काली तिची अनेक रुपे, शीव त्याची अनेक रुपे, गणपती (विनायक), मारुती, अल्लाह आहेत. म्हणजे मोक्षार्थी हिंदूनी परमेश्र्वराच्या रुपांची किंवा ईश्र्वरांची आराधना करावी, असें गृहीत धरलेले आहे आणि प्रापंचिकांनी पितर पिशाच्च प्रकारातील देव पुजावेत. पितर अगदी पहिला जन्मलेले म्हणून प्रथम मेलेले. त्यांना आदिदैवते असेंसुद्धा म्हणतात. इतर धर्मांत एकच आदिमानव असल्याचा दावा (Adam) केला आहे परंतु, हिंदूंत अनेक पितर असल्याचा दावा केलेला आहे. पितर पिशाच्च ह्यांतील फरक असा, पितर सर्व मनुष्य जातीचे पूर्वज आहेत तर पिशाच्च हल्लीच जन्मून मेलेले लोक असतात. उदाहरणार्थ, सर्व भारतीयांचे पितर एकच असतात पण पूर्वज मात्र निरनिराळ्या माणसांचे निरनिराळे असतात. ह्या पितरांना दैविक शक्ती असतात म्हणून त्यांची पुजा करण्याचा प्रघात हिंदूंत आहे. अघोर विचाराप्रमाणे पिशाच्च जसें जास्त जुने होते तसें त्यांना दैविक अथवा दानवी (सैतानी) सामर्थ्य प्राप्त होत असते. तूर्त आपण फक्त दैविक शक्तिचा विचार करत आहोत पण दानवी शक्तिचा विचार केल्याशिवाय कोणत्याही धर्मांचा अभ्यास पूर्ण होत नसतो. प्रत्येक धर्मात दैवी दानवी (आसुरी) शक्तिंचे संतुलन कसे राखावयाचे त्याबद्दलचे मार्गदर्शन असते. मनुष्याला त्याचे जीवन सुखी करण्यासाठी ह्या दोनही शक्ति निरनिराळ्या प्रकारे सहाय्य अथवा विरोध करीत असतात. गीतेत सोळाव्या भागात दैवी आसुरी संपदाची चर्चा केलेली आहे.
वैदिक काळातील पितरांची नांवे वेगळी आहेत येथे कलियुगातील नांवे दिली आहेत. पितर वर्गात येणारी दैवते अशी, राम, कृष्ण, दत्त, नवनाथ, पांडुरंग, महावीर, गौतम बुद्ध, साईबाबा, अक्कलकोट बाबा, यक्षिणींची अनेक रुपे, येशुदेव, मुसादेव, मोहम्मद, अलि, अजमेर चीस्ती, हाजी मलंग, गजानन महाराज व तत्सम अनेक अवतारी व इतर साधुपुरुष आहेत. अल्लाहचे अनेक गण आहेत त्यांना देवदूत म्हणतात ते सुद्धा पितरांत गणले जातात. ह्याचा अर्थ संसारी हिंदूंनी ह्यांची आराधना करावी असें गृहीत धरलेले आहे. त्यातसुद्धा कांहीं पितर देव विशेषकरून संन्याशांसाठी पुजनासाठी योग्य समजली जातात ती, दत्त, नवनाथ, पांडुरंग, अक्कलकोट बाबा, मोहम्मद अशी आहेत. म्हणजे प्रापंचिकांनी त्यांची आराधना करू नये कारण, तसें केल्यांने तो प्रापंचिक त्याच्या संसारी जीवनांत अनेकविध सतत येणार्या अडचणींमुळे त्रासून जातो व अखेरीस संन्यासाकडे वळतो. मोक्षार्थींने राम, कृष्ण, गौतम बुद्ध, महावीर, अल्लाह हे पुजावेत. केवळ प्रपंचात रमण्याची इच्छा असणार्यांनी संतोषी देवी, महालक्ष्मी, अशी कालीची अनेक रुप, साईबाबा, यक्षिणी व तिची अनेक रुपें, येशुदेव, मुसादेव, अलि, अजमेरचीस्ती, हाजी मलंग, गजानन महाराज, अल्लाहचे देवदूत (Angel) वगैरे पुजावेत. याचकांनी एक पितर पुजतांना इतर पितर व पिशाच्च देवांची जरी पुजा नाही केली तरी अनादर मात्र करू नये असा संकेत आहे. प्रापंचिक प्रश्र्नांसाठी सामान्य भाविकांने ईश्र्वराकडे याचना केली तर ओघांने त्यांचे देवदूत मदत करावयांस येतील अशी अपेक्षा करणे अयोग्य असते. त्यासाठी याचकांने, "तुझ्या देवदुतांस मला मदत करावयांस सांग", अशी प्रार्थना करावयाची असते, जर तसें केले नाही तर बहुधा ती प्रार्थना वाया जाते.
क्रमशः पुढे चालू
मनुस्मृतीचा पांचवा भाग सुरू - ११०
स्वतःचे गुरू, आचार्य, पिता, माता, उपाध्यय, अशांना (त्यांच्या मृत्यूनंतर) पाणी पाजण्याने विद्यार्थायाचे व्रत मोडत नाही. ९१
शुद्राचे शव गांवाच्या दक्षिण वेशीतील दरवाज्यातून बाहेर काढावे, द्विजाचे शव पश्चिम, उत्तर अथवा पूर्व वेशीतील दरवाज्यातून गांवाबाहेर काढावे. ९२
राजा, व्रतस्थ सत्र चालवणारे ह्यांना सुतक लागत नाही. कारण, राजा इंद्राचा प्रतिनिधी असतो. दुसरे दोघे ब्रह्मासारखे कायम शुद्ध समजले जातात. ९३
गादीवर बसलेल्या राजाचे शुद्धीकरण तात्काल करावे कारण, त्याला जनतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असते. ९४
तोंच नियम इतर कांही लोकांना लागू होतो ते लोक असें, युद्धात मेलेले, वीज पडल्यामुळे मेलेले, राजाने फाशी दिलेले, गाय ब्राह्मणाच्या संरक्षणार्थ मेलेले आणि ते ज्यांना राजा शुद्ध मानतो. ९५
राजाला जगातील आठ रक्षकांचा प्रतिनिधी समजले जाते. ते आठ रक्षक असें, चंद्र, अग्नी, सूर्य, इंद्र, कुबेर, पाणी वरूण. ९६
कारण किं, हे आठ रक्षक राजाला कोणामुळे अशुद्ध होऊ देत नाहीत. सामान्य माणसाला अशुद्धी होते कारण, हे आठ रक्षक त्याचे पास नसतात. ९७ टीपः राजाच्या राज्याभिषेकाच्या विधीत ह्यांना आवाहन करणे हा मुख्य विधी असतो.
जो क्षत्रिय लढाईत तीक्ष्ण शस्त्राने मारला गेला आहे त्याची शुद्धी स्रौतविधीने ताबडतोब होत असतो. म्हणून, सुतकाचा काळ उरत नाही. हा सर्वमान्य नियम आहे. ९८ टीपः म्हणून युद्धात धारातीर्थी पडलेल्यांचे सुतक नसते.
सुतक विधी झाल्यावर तो विधी करणारा ब्राह्मण पाण्याला स्पर्श करून शुद्ध होतो. क्षत्रिय त्याच्या शस्त्रांना घोड्याला स्पर्श करून शुद्ध होतो. वैश्य त्याच्या बैलाच्या लगामीला स्पर्श करून शुद्ध होतो शुद्र त्याच्या हातातील दंडास स्पर्श करून शुद्ध होत असतो. ९९
सपिंडाच्या मरणानंतर काय करावे ते सांगितले, अहो उत्तम द्विजांनो, आता ऐका सामान्य माणसांची शुद्धी त्याच्या सपिंड नसलेल्या नातेवाईकांच्या मरणानंतर कशी करावी ते. १००
सपिडेतर ब्राह्मणाचा मृत्यूविधी जर पुरोहितांने केला तर तो पुरोहीत तीन दिवसांचे सुतक पाळील. १०१
जर तो श्राद्धाच्या जेवणास गेला तर दहा दिवसांचे सुतक पाळील. जेवता परत आला तर मात्र एक दिवसाचे पाळील. १०२
प्रेतयात्रेस गेला तर घरी आल्यावर नेसत्या वस्त्रानिशी अभ्यंग स्नान करून नंतर पवित्र अग्नीला स्पर्श करून साजूक तूप चाखून शुद्ध होतो. १०३
मृत ब्राह्मणाचा देह शुद्रांने स्मशानात वाहून नेऊ नये जर त्याच्या वर्णाचे लोक उपस्थित असतील. शुद्रांने चीता पेटवली तर त्या ब्राह्मणाला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. १०४
मरणार्याची शुद्धी ब्राह्मणाच्या तत्त्वशिलतेने, अग्नीने, पवित्र खाद्यपदार्थांनी, मातीनी, भोगेंद्रियांच्या संयमाने, पाण्याने, शेणसारा केल्याने, पवित्र विधी करून, वार्याने, सूर्याच्या प्रकाशाने, आणि काळाने होत असते. १०५
शुद्धीकरणाच्या सर्व प्रकारात संपत्ती मिळविण्याची शुद्धी सर्वश्रेष्ठ आहे. कारण, सत्मार्गांने संपत्ती मिळविणे हेंच सर्वश्रेष्ठ काम असते. माती पाण्याने शुद्धी करणे कमी महत्वाचे असते. १०६
पंडिताचे शुद्धीकरण क्षमाशील स्वभावाने, ज्याने अक्षम्य अपराध केला आहे त्याचे दयाळूपणाने, गुप्तपणे पाप करणार्याचे शुद्धीकरण पवित्र मंत्र पुटपुटून वेदाचे ज्ञान असलेल्याचे शुद्धीकरण तत्त्वशिलतेने होते. १०७
माती पाण्याची शुद्धी आवश्यक असते. नदीची तिच्या प्रवाहीत रहाण्याने होते, स्त्रीची तिच्या मासिकपाळीने ब्राह्मणाची सन्यस्थ वृत्तीने होत असते. १०८
बाह्य शरीर पाण्याने शुद्ध होते, आतील भाग सत्याच्या आग्रहाने, माणसाचा आत्मा त्यातील तत्त्वशिलतेने शुद्ध होतो, बुद्धीची शुद्धता खर्या ज्ञानाने होत असते. १०९
अशारितीने शरीराची शुद्दता कशी करावी ते सांगितले आता निर्जीव वस्तुंची शुद्धी कशी करावी ते सांगतो. ११०

मनुस्मृतीचा पांचवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.