शनिवार, ३० एप्रिल, २०१६

पाण्याचा प्रश्र्न -२

आपण आधीच्या पोस्टमध्ये दर वर्षी येणार्या पुरामुळे जमिनीत भूजलाचा भरणा होत असतो त्याची माहिती पाहिली. आता सर्वच मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधली असल्यामुळे तसें पूर आता येणार नाहीत. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत राजी सोडून इतरत्र फार कमी पाऊस पडतो. त्यामुळे जो पाऊस तेथे पडतो तो जरी सर्वच जमिनीत जिरवला तरी त्यांने जमिनीत भूजल पातळी सुधारण्यास फारशी मदत होणार नाही. पाणी वाचवण्याच्या कोणत्याही योजनेमुळे कांही मोठा फरक पडेल असेही नाही. अशा परिस्थितीत काय करणे जरुरीचे आहे ते पहावे लागेल.

धरणात साठवलेले पाणी जरुरीपेक्षा जास्त असते तेवढे पाणी साठवून ठेवण्याची खरं तर गरज नसते. आवश्यकते एवढे पाणी साठवल्यावर उरलेले पाणी धरणाचे दरवाजे उघडून नदीतून तिच्या पात्रात सोडले तर नदीचे पात्र भरून वाहू लागेल तिच्या पात्राच्या भोवतीचा मोठा भूप्रदेश पूर आल्याप्रमाणे भूजल पातळी सुधारण्यास मदत करील. त्यासाठी आणखीन कांहीं गोष्टी कराव्या लागतील. त्यात छोटे बंधारे येतात. नदीच्या पात्रात तिच्या उतारानुसार अंतरा अंतरावर चार फुट उंचीचे बंधारे बांधल्यानें अशा दोन बंधार्याच्या मधील पात्रात पाण्याचा साठा होईल. अशा बंधार्यांना इंग्रजीत चेक डॅम म्हणतात. असें बंधारे जमिनीबाहेर चार फुट उंचीचे असतील जमिनीत निदान २० फुट खोल त्यांचा पाया असेल. असें बंधारे नदीच्या पात्राच्या दोन किनार्यांना जोडणारे असतील. अशा जवळच्या दोन बंधार्यातील अंतर त्या नदीच्या उताराप्रमाणे कमी जास्त असेल. जर नदीचे पात्र सपाट भूप्रदेशातून जात असेल तर अशा दोन बंधार्यातील अंतर १० किलोमीटरसुद्धा असू शकते. ह्या बंधार्यात त्या भागात पडणार्या पावसाचे पाणीसुद्धा साठवले जाईल त्यामुळे पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यात ते उपयोगी ठरतील. म्हणजे असे बंधारे सर्व नदीच्या पात्रात तिच्या लांबीतून असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात संवर्धन करतां येईल.
अशा बंधार्याचे आणखीन कांहीं फायदे आहेत. त्यातून मत्स्योद्योग करता येईल. बंधारे चांगले तीस फुट रुंद केल्यास त्यावरून वाहतुक करता येईल. नदीचे दोन किनारे जोडणारे पुल म्हणून त्यांचा उपयोग करता येईल.
धरणातून अशारितीने पाणी सोडल्यास धरणात साठलेला गाळ काढून टाकला जाईल धरणाची क्षमता कमी होण्याचे थांबेल. साधारणपणे धरणांची धारण क्षमता कमी होत असते ते होणार नाही. त्याशिवाय, कांहीं धरणांतून पाणी उघड्या कालव्याने लाभार्थी शेतकर्यांकडे पाठवले जाते त्या ऐवजी ते बंद दाबनळ्यांतून पाठवण्याची जर व्यवस्था केली तर तेवढ्याच पाण्यात आजच्यापेक्षा चौपट क्षेत्र सिंचनाखाली येईल. बंद दाबनळ्यांतून पाणी पाठवल्यास पाण्या बरोबर पाण्याचा दाबसुद्धा वापरता येईल त्यामुळे वीजेची मोठी बचत होईल. अशारितीने पाणी मुंबईला गेली दिडशे वर्षे नेले जात आहे.
थोडक्यात सांगावयाचे असें किं, प्रश्र्न सोडवण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर कोणताही प्रश्र्न अवघड नसतो.

आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लोक २७७ - २८६ वाचू या.
जो यजमान चंद्रमासातील सम दिवशी समराशीला श्राद्ध करील त्याला नशीब मिळेल तसेंच जो विषम दिवशी विषम राशीला करील त्याला उत्तम संतती प्राप्त होईल. २७७
श्राद्ध करण्यासाठी शुक्लपक्षापेक्षा कृष्णपक्ष जास्त चांगला असतो, तसेंच दुपारच्यापेक्षा मध्यन्ही (दिवसाचे दुपार नंतरचा काळ -३० ते -३०) जास्त चांगला असतो. २७८
कंटाळा करतां यजमानाने दिलेल्या पद्धतीने पितरांच्या सन्मानार्थ जान्हवे उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर घ्यावे (सव्य अपसव्य करावे) ते करतांना हातात कुस गवताची पात हातात धरलेली असली पाहिजे. २७९
श्राद्धविधी रात्री, संध्याकाळी, उषःकाली अशा वेळी करू नये कारण, त्यावेळी राक्षस कार्यरत असतात. ते, श्राद्धाचे फळ पितरांपर्यंत पोहोचू देत नाहीत. २८०
यजमानाने श्राद्ध वर्षातून तीनदा करणे चांगले असते. हिंवाळ्यात, उन्हाळ्यात पावसाळ्यात असें ते असावेत. तसेंच दररोजची पांच दाने करावीत. २८१
पितरांसाठी जे यज्ञ करावयाचे त्यासाठी जी आहुति द्यावयाची ती पवित्र अग्नीत देऊ नये, त्यासाठी वेगळा होम असावा. तसेंच प्रतिपदेच्या दिवशी हा विधी करू नये. २८२
खरा ब्राह्मण जेव्हां स्नान उरकल्यावर पितरांसाठी अर्ध्य देतो तेव्हां त्याला पितरांचे त्या दिवशीचे श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते. २८३
वेदाच्या नित्य ज्ञानाप्रमाणे पितरांच्या आधी वसु त्या आधी रुद्र आणि त्या आधी आदित्य आहेत हे लक्षात ठेवावे. २८४
त्यांने (यजमानाने) दररोज विघास आणि अमृत चाखावे. विघास म्हणजे ब्राह्मणांचे जेवण झाल्यावर उरलेले खाद्यपदार्थ, अमृत म्हणजे यज्ञ केल्यावर उरलेले अर्ध्य असलेला प्रसाद. २८५
अशारितीने तुम्हाला दररोजचे पांच यज्ञ कसे करावेत त्याबद्दलची धर्माज्ञा काय आहे त्याची माहिती दिली आहे. ह्यापुढे ब्राह्मणानें कसे जगावे ते सांगतो ते ऐका. २८६
(ती पांच दाने (यज्ञ) आधी (७० मध्ये) सांगितली ती अशीः . विद्यार्थ्याला शिकवणे, . पितरांसाठी तर्पण करणे (पाण्याचे), . देवांसाठी होमात हवन करणे, . भूतांसाठी बळी म्हणून मांसाचा प्रसाद देणे, . आदरपूर्वक पाहुण्यांना वागवणे, आहेत.

मनुस्मृतीचा तिसरा भाग संपला, पुढील पोस्ट पासून चौथा भाग पाहू या.
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.