शनिवार, १ जून, २०१९

हिंदू कोण – ६६

मागील भागातून पुढे
८०. आपण पाहिले किं, मृतात्म्यास आपल्याला संपर्क करण्याला वेळ लागतो. माझ्या आईस मला सांगण्यास कांही महिने कां लागले? त्या मुलास सुद्धा पुन्हा स्वप्नात येण्यास कांही महिने लागले असें कां? अशा अनेक प्रश्र्नांची उत्तरे माहीत नाहीत. एवढे मात्र हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे किं, पिशाच्चांस व देवतांस संपर्क करण्यासाठी वेळ लागतो. म्हणून जर तो कांही साधना करीत असेल तर त्याचे त्वरीत परिणाम मिळावेत अशी अपेक्षा करू नये. अधीर न होता आपली साधना चालू ठेवावी.
८१. मृतात्मा पिशाच्च अवस्थेत असतांना इतर प्राण्यांत प्रवेश करू शकतात. त्याला पछाडणे असें म्हणतात. माणसांत फक्त मनुष्य गणात असणार्या व्यक्तिलाच पिशाच्च पछाडू शकते (जन्म पत्रिकेतील अबकहडा चक्रात तो गण दिलेला असतो) पण इतर प्राण्यात कोणत्याही जीवांस, विषेशकरून कावळ्याला, पछाडू शकते. इतर प्राण्यांत्याती आत्मा सुप्त अवस्थेत असतो म्हणजे नसल्या सारखाच असतो, तरी पिशाच्च त्याच्या मेंदूवर प्रभाव करू शकते. विशेषकरून जो मृतात्मा असंतुष्ट असतो तोंच अशारितीने प्राण्यावर बसतो. कुत्रा अशी असंतुष्ट पिशाच्च पाहू शकतो असें समजतात. बर्याच वेळा अशी भूत पाहून कुत्री रडू लागतात.
आणखीन कांहीं गोष्टी लक्षात घ्यावयाच्या असतात. त्या अशा किं, साधारणपणे माणसे पिशाच्च, भूत असें म्हंटले किं, ताबडतोब घाबरून जातात ते बरोबर नसते. बर्याच वेळा ही पिशाच्चे कांहीं सांगण्याचा प्रयत्न करीत असतात त्या वेळी माणसांने घाबरून कांहीं अयोग्य कारवाई केली तर ती त्याला त्रासदायक ठरू शकते. बर्याच वेळा ही पिशाच्चे अतिशय अडचणीत असतात, त्यांना माणसाच्या मदतीची गरज असतें अशा वेळी माणसांने त्यांना मदत करणे श्रेयस्कर असते. जर पिशाच्च संपर्क झाला तर प्रथम न घाबरतां त्या पिशाच्चास काऊ घास (पिंड) द्यावा व त्याला शांत होण्यास सांगावे. असें केल्याने ते अडचणीत असलेले भूत शांत होते व मग यथावकाश ते कांहीं संदेश देऊ शकते. यथावकाश असें सांगण्याचे कारण, भूत व माणूस ह्याच्यात संपर्क होण्यास कांहीं अज्ञात कारणांमुळे विलंब लागत असतो. त्यांच्याकडे आत्मियतेने पहावे. असें वागल्यास ती भूतं माणसांस पुढे सहायक होतात. भूतं नेहमीच वाईट नसतात. बर्याच वेळा ती उपयोगी येणारी असतात. पूर्वज भूत असेल तर विशेष आदरपूर्वक वागावे, ते चांगले असते. बिलकूल घाबरू नये. पिशाच्च्यांच्या अस्तित्वाची लक्षणे निश्र्चितच भयावह असतात तरी मन शांत ठेवून त्यांना सामोरी जावे. तूर्त एवढेच पुरे कारण, "पिशाच्च साधना", हा मोठा विषय आहे. शाक्त, अघोर व तंत्रविद्येची परंपरा जपणार्या हिंदूंच्या जीवनात ही साधना महत्वाची आहे, म्हणून ही माहिती दिली आहे.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – ९१ -४००
अशावेळी शहाणा राजा प्रथम त्या द्विजांना गोड बोलून शांत करील. त्यानंतर ब्राह्मणांना बोलावून त्याच्या मदतीने तो त्या द्विजांना त्यांची कर्तव्ये समजावून सांगेल. ३९१
जो ब्राह्मण आपल्या शेजारी ब्राह्मणास व तो त्याच्या शेजारी ब्राह्मणास, जरी ते सन्मानासाठी योग्य असले तरी, आमंत्रण देत नाही त्याला एक मशा एवढा दंड होऊ शकतो. ३९२
जो श्रोत्री दुसर्या योग्य श्रोत्रीस शुभकार्यासाठी बोलावत नाही त्याला तसे वागण्यामुळें त्या दुसर्या श्रोत्रीस एक जेवणाचा खर्च व राजाला तो एक सोन्याचे मासा एवढा दंड देईल. ३९३
आंधळा, मूर्ख, अपंग, काठी घेऊन चालणारा, सत्तरी ओलांडलेला, आणि जो श्रोत्रीस त्याचा वाटा देतो त्यांना राजाला कर भरावा लागत नाही. ३९४
राजा नेहमी श्रोत्रीस, आजारी माणसास, लहान मुलास, वयस्कर माणसास, उच्च कुलिन, सन्माननीय व्यक्तीस ह्यांच्याशी प्रेमाने वागेल. ३९५
परिट, सल्मली वृक्षाच्या गुळगुळीत फळीवर कपडे आपटून धुण्याचे काम करील. तो ज्याचे वस्त्रं त्यालाच देऊल व दुसर्याला वापरण्यास सुद्धा देणार नाही. ३९६
कोष्ठी दहा पना घेऊन कापड बनवेल ते अकरा पनाला विकेल. त्यापेक्षा जास्त किंमत घेतली तर त्याला बारा पना दंड होईल. ३९७
राजा वस्तुच्या किंमतीच्या विसाव्या भागा एवढा कर आकारेल. त्यासाठी जाणकार मंडळी वस्तुची किंमत आणणावळ, इतर खर्च, कच्च्या मालाची किंमत, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ती ठरवतील. ३९८
जर व्यापार्याने राजाच्या हक्काच्या चीजांची अथवा बंदी घातलेल्या मालाची निर्यात त्याला न विचारता केली तर त्या व्यापार्याची सगळी संपत्ती राजा जप्त करू शकतो. ३९९
जर व्यापार्यानी अबकारी कर न भरता माल विकला, मालाची योग्य किंमत दाखवली नाही, अयोग्य ठिकाणी व अयोग्य वेळी विक्री केली तर त्याने जेवढा कर बुडवला त्याच्या आठपट दंड तो भरेल. ४००

क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा