सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

हिंदू कोण – ३७

मागील भागातून पुढे
. हिंदूंतील पुनर्जन्माच्या विचाराची माहिती – पुढे चालू
आपण पहातो किं, कांहीं माणसे आयुष्यभर सचोटीने जगत असतात परंतु, त्यांच्या जीवनात केवळ दुःख लिहीलेले असते. असे होण्याचे कारण, आज जरी तो इसम सचोटीने जगत असला तरी गेल्या जन्मी त्याने बरेच खोटे काम केले असले पाहिजे व तो ते आज भोगत आहे. तसेंच ह्या जन्मातील चांगल्या कामामुळे पुढील जन्मी मात्र तो सुखात रहाणार आहे हे निश्र्चित. ह्या उलट असेसुद्धा दिसते किं, एकादा माणूस सदोदित वाईट कामात गर्क असतो तरीसुद्धा तो अगदी मजेत असतो, त्याचे कारण कर्मविपाकाच्या ह्या नियमानुसार त्यांने मागिल जन्मी चांगले काम केले होते ते तो भोगत आहे व आता जे कुकर्म करीत आहे ते तो पुढील जन्मी भोगणार आहे. कांही माणसे असे समजतात किं, ह्या जन्मीच्या कर्माची फळे ह्याच जन्मी भोगावी लागतात परंतु, ह्या समजाला हिंदूंच्या शिकवणुकीत आधार नाही, ते त्या त्या माणसांचे त्याचे सोईस्कर असें गैरसमज असतात.

५५. पुनर्जन्माचा संबंध अशारितीने लिंगदेहाशी म्हणजे पर्यायाने नशिबाशी निगडीत आहे म्हणून नशीबाच्या व्यवहाराबाबत जी माहिती आहे ती येथे देत आहे. माणसाचे नशीब व त्याचे व्यवहार पैशाच्या व्यवहारासारखे असतात. जसें पैशाच्या व्यवहारात माणूस पैसे नसतील तर कर्ज काढतो तसें नशीबसुद्धा पुण्याचे कर्ज काढून सुधारता येते, त्याबद्दलचा हिशेब कसा असतो ते पाहूया. देवता गणांकडे मोठा पुण्यसंच असतो. त्यातून कर्ज काढता येते असा समज आहे. त्यासाठी विशिष्ट पद्धतीने पुजा होत असते त्या पुजेत याचक देवतेला आश्र्वासन देतो किं, तो आवश्यक तेवढा पुण्यसंचय करून ते कर्ज फेडेल. जर ती देवता प्रसन्न झाली तर ती आपले पुण्य कर्जरुपांने भक्तांस देते असे समजले जाते. अर्थात् ते कर्ज असते म्हणजे त्याची परतफेड भक्ताला करावी लागते हे उघड असते. ती परतफेड पापमुक्त व पुण्यकारक जीवन जगून फेडता येते, असे समजले जाते. नवसात जे तो बोलतो जसें, खणा नारळानी ओटी भरीन वगैरे, तर तेवढे करून तो याचक समजतो किं, त्यांने नवस फेडला. परंतु, तो भाग नवसाचा बाह्य भाग असतो, आतील भाग जो अशा नवसांत गृहीत समजला जातो, ज्यात त्यांने पुण्य संच करण्याचे आश्र्वासन दिलेले असतें ते तसेंच राहून जाते. दुर्दैवाची गोष्ट अशी किं, कोणताही भक्त हा पवित्र नियम पाळत नाही व त्यामुळे तो मृत्युनंतर मोठ्या अडचणीत जातो. ह्यासाठी जर कोणत्याही देवतेकडे नवस करावयाचा असेल तर केवळ (बाह्य) नवस फेडण्याने त्याची सुटका होत नाही हे त्या भक्ताने लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या ह्या जन्मात कोणते काम केल्यामुळे पुढच्या जन्मी कोणते चांगले अथवा वाईट भोग भोगावे लागतील हे पहाता असें सांगता येईल कीं, हिंदू इसम, ह्या जन्मातील कामाच्या मदतीने त्याच्या पुढच्या जन्माचे भोग ठरवू शकतो. नवसाबद्दल आणखीन थोडे पाहूया. दोन याचक एका देवतेकडे नवस करतात, त्यातील एकाचा नवस पुरा होतो व दुसर्याचा होत नाही. असें होण्याचे कारण, दुसर्याचा पुण्यसंचय कमी आहे असें समजावयाचे असते. त्यासाठी खर्या हिंदूंनी पापमुक्त जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत जावे. आपली खरी लक्ष्मी आपला पुण्यसंच आहे, पैसे नाहीत. हे हिंदूंनी लक्षात ठेवावे. कारण, पुण्यसंचय ही शाश्र्वत संपत्ती असते. पैशाची देवता कुबेर अथवा गणपती आहे व ती संपत्ती अशाश्र्वत असते. सत्कृत्यापेक्षा ध्यान साधना जसें, विपश्यना साधना, सोऽहम् साधना करण्यामुळे पुण्यसंच जास्त होत असतो म्हणून हिंदूंनी अशा साधना मध्ये आपला फावला काळ व्यतित करावा अशी अपेक्षा असते. ह्या आणि अशा अनेक गोष्टींसाठी खर्या हिंदूंनी ब्राह्मण पुरोहितांकडून मार्गदर्शन घेऊ नये कारण, तो नेहमी खोटा सल्ला देतो असा अनुभव आहे. कदाचित् त्यालासुद्धा खरे काय ते माहीत नसते.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू १११ -१२०
शहाण्या माणसाने कधीही खोटी शपथ घेऊ नये. कारण, असें केल्याने त्याचा नाश ह्या जन्मात होतोच परंतु, पुढील जन्मीसुद्धा होत रहातो. १११
ब्राह्मणाला मदत करण्यासाठी, गाईसाठी गवत मिळवण्यासाठी, घरात जळण पाहिजे म्हणून, स्त्रीशी लग्न करण्यासाठी आपला वर्ण लपवण्यासाठी, भूक लागल्यास खाण्यासाठी अशा कारणांकरतां जर खोटे बोलले तर ते क्षम्य आहे. ११२
गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी, न्यायाधीश ब्राह्मणाला त्याच्या वर्णाची शपथ घ्यावयास लावेल. क्षत्रियास त्याच्या रथाची, शस्त्रांची, घोड्याची शपथ घ्यावयास लावेल. वैश्यास त्याच्या खजिन्याची, धान्याची, सोन्याची शपथ घ्यावयास लावेल. शूद्रास त्याच्या डोक्याची शपथ घ्यावयास लावेल. ११३
तेवढ्याने नाही झाले तर न्यायाधीश त्या साक्षीदाराला अग्नी परीक्षा, जल परीक्षा घ्यावयास लावू शकतो. शेवटी त्यांना त्यांच्या बायका मुलांची शपथ घ्यावयास लावू शकतो. चुकीचा वर्ण धरून शपथ घ्यावयास न्यायाधीशांने सांगितले तर तो न्यायाधीश नरकात जाईल. ११४
अग्नी परीक्षेत ज्याला आग जाळत नाही, जो पाण्यात राहू शकतो, ज्याला कांहीं ईजा होत नाही तो निष्पाप समजावा. ११५
उदाहरणार्थ, जेव्हां वत्साला त्याच्या भावाने आरोप केला तेव्हां अग्नी (अग्नी देवांचा हेर समजला जातो) परीक्षेत त्याच्या केसालाही आगीने स्पर्श केला नव्हता, कारण तो निरपराधी होता. ११६
जेव्हां खोटी साक्ष दिली आहे असें समजेल तेव्हां न्यायाधीश निकाल उलटवेल व जो कांहीं निकाल ठरला होता तो रद्द होईल. ११७
लोभीपणाने, अस्वस्थ मनाने, भिऊन, दोस्तासाठी, वासनेपायी, रागांत, अज्ञानामुळें, पोरकटपणामुळे जी साक्ष दिली जाते ती अग्राह्य ठरेल. ११८
मी आता सांगतो, जर वरील कारणांमुळें खोटी साक्ष दिली तर त्या साक्षीदाराला कोणती सजा द्यावयाची. ११९
लोभामुळे जो खोटी साक्ष देतो त्यास एक हजार पना (त्या काळातील रुपयासारखी मुद्रा) दंड करावा. जो अस्वस्थ मनाने साक्ष देईल त्याला सर्वात कमी (एक अमर्समण) दंड करावा. भिऊन देणार्यास त्यापेक्षा थोडी जास्त, दोस्ती अथवा वासनेपोटी दिल्यास त्याच्या चौपट दंड करावा. १२० टीपः अमर्समण हे त्या काळातील सर्वात कमी मुल्य असलेले नाणे (आजचा एक पैसा) होते.

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा