गुरुवार, २९ जून, २०१७

हिंदू कोण – २८

. हिंदूंतील पाप - पुण्य विचार
मागील भागातून पुढे -
४२. पाप म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? ह्याचा प्रथम विचार करावा लागेल. इतर धर्मांत त्या धर्माचे नियम न पाळणे हे पाप समजले जाते. आणि त्यांचे पालन करणे म्हणजे पुण्य समजले जाते. हिंदूंत असे कांहीं खास बंधनकारक नियम नसल्यामुळे पापाची व्याख्या अध्यात्म शास्त्राशी निगडीत अशी समजली जाते. येथे थोडक्यात आपण हिंदूंच्या पाप कशाला समजावयाचे त्याबद्दलच्या ज्या कांहीं संकल्पना आहेत त्या पहाव्या लागतील. थोडक्यात व्याख्या अशी,
ज्या प्रकारे विचार व त्यानुसार कृती केल्यामुळे माणसाचा अध्यात्मिक र्हास होतो ते पाप व ज्यामुळे अध्यात्मिक उद्धार होतो ते पुण्य, असें समजावयाचे असते. म्हणजे, पाप पुण्याचा संबंध अध्यात्मिकतेशी आहे हे लक्षात ठेवावे. इतर धर्मात तसें नसते.
षड्रीपुंच्या अतिआहारी गेल्यामुळे जे गैरकृत्य होते त्या कृत्याला पाप असे समजले जाते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर अशा सहा विकारांच्या अतिआहारी जाणे म्हणजे पाप. त्या उलट अर्थात् पुण्य म्हणजे, ह्या सहा विकारांच्यापासून आत्मारामाने मुक्त रहाणे. ही झाली तात्त्विक व्याख्या पण साधारण माणसास समजण्यासाठी जास्त विवरणाची आवश्यकता असते. ह्या सहा प्रवृत्तिंची अधिक माहिती पहावी लागेल. ह्या सहा विकारांपैकी काम, लोभ व मोह हे माणसाच्या जीवास काम करण्यास उद्युक्त करतात म्हणून ते योग्य मर्यादेत माणसास (जीवांस) जगण्यासाठी आवश्यक असतात. फक्त जेव्हा ते सुरक्षित मर्यादा ओलांडतात तेव्हांच ते दोष अथवा रिपु (रिपु म्हणजे शत्रु) म्हणजे पापकारक ठरतात. क्रोध, मद व मत्सर हे तीन माणसास स्वसंरक्षणासाठी आवश्यक असतात. परंतु जेव्हां ते स्वसंरक्षणा ऐवजी इतर कारणांसाठी उत्तेजित होतात तेव्हा ते दोष अथवा रिपु म्हणजे पापकारक ठरतात. म्हणजे, सुरक्षित मर्यादेत जर ते कार्यरत असतील तर त्यांच्यामुळे पाप होत नाही. क्रोध विकाराचा दुसरा आविष्कार दुःख आहे. म्हणजे जेव्हां माणूस कमजोर असतो तेव्हां तो क्रोधी होत नाही तर दुखी होतो. तसेंच मद व मत्सर ह्यांचा दुसरा आविष्कार आहे, स्वामित्वाची तीव्र भावना, जी प्रेमात, मित्रत्वाच्या नात्यांत जाणवते. ज्याला इंग्रजीत पझेसिवनेस (possessiveness) असें म्हणतात. म्हणजे, जेव्हां माणूस बलवान असतो तेव्हां तो स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न करतो व कमजोर असतो तेव्हां मत्सर करतो. ह्याचा अर्थ माणसाच्या अंगिभूत सामर्थ्यानुसार प्रतिक्रिया व्यक्त होत असते. अतिदुःखी अथवा अतिक्रोधी होणे अथवा स्वामित्वाची भावना (हे माझे, ते माझे अशी विचारसरणी) बाळगणे पापकारक असते.
एका उपनिषदात ह्या सहा विकारांना सहा साखळदंड सांगून त्याच्यामुळे आत्म्याला लिंगदेह जखडला गेला आहे आणि साधक त्याच्या साधनेने हे सहा साखळदंड एक एक करून तोडून टाकतो व जेव्हां सर्व साखळदंड तुटून पडतात तेव्हां तो आत्मा ह्या जन्म मरणाच्या बंधनातून कायमचा मुक्त होते असे वर्णन केले आहे. हे सहा विकार जरी वस्तुतः जीवाला सहाय्य करण्यासाठी असले तरी आत्मा त्यांत गुंतल्यामुळे सर्व गुंतागुंत वाढत असते. खर्या हिंदूंनी आपला आत्माराम, देहाच्या व्यवहारांपासून दूर ठेवण्यात यश मिळवले पाहिजे अशी अपेक्षा असते. म्हणजे प्रत्येक हिंदू एकापरीने साधकच असला पाहिजे अशी अपेक्षा असते. देह, जीव, लिंगदेह व आत्मा ह्याच्या संबंधा बाबतची माहिती पुढे दिली आहे ती पहावी. पापाचे आणखीन एक कारण सांगितले आहे ते हिंसेशी संबंधित असते. हिसा म्हणजे दुख, वेदना निर्माण करणे, वेदना देणे. तीन प्रकारच्या हिंसा सांगितल्या आहेत. शरीराचे दुःख, मनाचे दुःख व तिसरे आहे, हितद्वेषाचे दुःख. हितद्वेषांत आर्थिक फसवणूक, विश्र्वासघात, खोटी आश्र्वासने देणे वगैरे तत्सम कृती येतात. शरीराचे दुःख ह्यात शारिरीक त्रास, वेदना देणे (स्वताला अथवा दुसर्याला) अशी कृत्ये पापकारक समजली आहेत. अपमान करणे, खिजवणे, टोमणे मारणे, दुर्लक्ष करणे, खोटे आरोप करणे, ज्या गोष्टींमुळे एकाद्याच्या मनांस वेदना होतात अशी सर्व कृत्ये पापकारक समजली जातात. जैन धर्मात हिंसा हे मोठे पापकृत्य समजले आहे.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती सातवा भाग सुरू – २२२ – २२६
राजा त्याचा शाही पोषाख घालून प्रवेश करील व सैन्याची पहाणी करील, तसेंच त्याचे रथ, प्राणी, शस्त्रे इत्यादी गोष्टींची पहाणी करून त्या सज्ज आहेत किंवा कसें ते पाहिल. २२२
संध्याकाळची प्रार्थना केल्यावर तो आतील कक्षात गुप्त बैठका घेईल. तेथे तो त्याच्या गुप्तचरांशी वाटाघाटी पुन्हा करील. २२३
त्यालंतर तो दुसर्या गुप्तखान्यात जाऊन तेथील काम आटोपेल. त्यानंतर पुन्हा तो अंतःपुरात राण्यांच्या व इतर स्त्री सेवकांच्या सहवासात जाईल. तेथे तो जेवण आपल्या राण्यांच्या बरोबर घेईल. २२४
राणीवासात जेवल्यानंतर तो संगीत, नृत्य ह्यांचा आस्वाद घेईल. त्यानंतर तो झोपेल. पुन्हा दुसर्या दिवशी तो पहाटे उठेल, त्यावेळी तो थकलेला नसेल. २२५
राजा जोवर उत्तम प्रकृतीत आहे तोवर तो अशारितीने काम करील व जर तो आजारी झाला तर त्याचा कारभार तो त्याच्या निकटच्या विश्र्वसनीय सेवकावर सोपवून देईल. २२६
मनुस्मृती भाग सातवा संपला -
मनुस्मृती आठवा भाग पुढील पोस्टपासून सुरु –
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा