सोमवार, ३ एप्रिल, २०१७

हिंदू कोण – १९

. हिंदूंतील पुजा करण्याच्या पद्धती
क्रमशः चालू
३०. ह्याबाबत एक सत्य घटना १९५६च्या सुमारास घडली ती सांगण्यासारखी आहे असें वाटते म्हणून ती येथे देतो. मुंबई जवळील अलिबाग नांवाच्या गांवात एक संन्यासी रहाण्यास आला. तीन वर्षापेक्षा जास्त काळ तो संन्यासी एका ठिकाणी रहात नसें. एक खोली तो भाड्याने घेतो, त्या खोलीत एक जुनी दिनदर्शिका भिंतीवर टांगलेली होती. त्या दिनदर्शिकेत दत्तगुरुंचे चित्र होते, ती थोडी फाटलेली होती. दत्तगुरु हे सर्व संन्याशांचे आराध्य दैवत असते त्यामुळे ते पाहिल्यावर तो संन्यासी प्रसन्न झाला. पुढे तो त्या चित्रावर त्राटक (त्राटकची माहिती पुढे दिली आहे) करून आपली तपस्या करू लागला. प्रसंगी फुलं, पान वाहून तो तिची पुजासुद्धा करीत असे. अशारितीने त्यांनी तेथे तीन वर्षे तपस्या त्या चित्रापुढे केली. तीन वर्षे झाल्यावर तो ती जागा सोडून निघून गेला. ते चित्र तसेंच जास्त फाटलेल्या अवस्थेत तेथे भिंतीवर टांगलेलेच राहिले. घरमालकांने नवीन भाडोत्र्यासाठी त्या खोलीचा रंग काढला. ते करीत असतांना ते काम करणार्या मजूरांने ते फाटलेले चित्र काढून बाजूला टाकले जसें त्या खोलीची साफसफाई झाली तसें ते फाटलेले चित्र आणखीन फाडून बारीक तुकडे करून तेथे काम करणार्या नोकरांने उकिरड्यात फेकून दिले. ही कथा दाखवून देते किं, देवाच्या चिन्हात्मक गोष्टींचे एकंदर साधनेत किती महत्व असते. असें असले तरी अश्रद्ध लोक मूर्तिपुजेची त्या संबंधित गोष्टींची टिंगल टवाळी करून हिंदू परंपरेची निर्भत्सना करतात असें नेहमी पहातो. हे त्यांचे अज्ञान असते.
३१. पाषाण पुजेनंतर त्या पाषाणाची जागा पाषाणाच्या मूर्तिने घेतली. भाविकांना पाषाणापेक्षा माणसाचा आकार असलेली मूर्ति जास्त चांगली वाटली असावी. त्याचवेळी कोणी पाषाणाला डोळे लावून तो अधिक जीवंत केला डोळे असलेले पाषाण पुजले जाऊ लागले. पुढे तेवढ्याने समाधान झाल्यांने भक्तांनी त्या पाषाणाला नाक, तोंड असे लावण्यास सुरुवात केली. त्यातूनच पुढे मूर्ति बनवण्यास प्रारंभ झाला. अशारितीने हिंदूंत मूर्तिपुजा प्रचारात आली. मूर्तिपुजेचे आणखीन एक स्पष्टीकरण मिळते त्याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. हे स्पष्टीकरण योगशास्त्राशी निगडीत आहे. योगशास्त्रात ध्यान करण्यासाठी एकाद्या गोष्टीवर एकटक नजर ठेवून त्या गोष्टीवर एकचित्त करण्याची एक पद्धत आहे. त्या कृतीस त्राटक करणे असें म्हणतात. त्राटक करण्यासाठी पाषाणापेक्षा अशी देवाची मूर्ति जास्त श्रेयस्कर असल्यामुळे देवांच्या मूर्ति त्राटक करण्यासाठी वापरण्याचा प्रघात पडला. साधारणपणे माणसाचा चेहरा असलेल्या मुर्त्या जरी जास्त प्रचारात आल्या तरी कांहीं मुर्त्या इतर प्राण्याच्या चेहरा असलेल्या सुद्धा प्रचारात आल्या त्यांत गणपती, मारुती, नृसिंह अशी उदाहरणे पहावयांस मिळतात. त्राटक करण्यासाठी सुपारी, नारळ, दिव्याची ज्योत अशा विविध चीजांचा उपयोगसुद्धा केला जातो. गौतम बुद्धानी देवतेच्या मूर्तिवर त्राटक करण्या ऐवजी श्र्वासोंश्र्वासावर त्राटक करण्याची पद्धत प्रचारात आणली, तिला विपश्यना असें म्हणतात, हिंदू तिलाच सोऽहम् साधना असें म्हणतात. सो म्हणजे श्र्वास आंत घेणे हंम् म्हणजे श्र्वास बाहेर टाकणे. ह्यात ह्या श्र्वासावर विचारशुन्य अवस्थेत डोळे मिटून असें त्राटक करावयाचें असते. अशारितीने अव्यक्त देवतांचे श्राद्ध जाऊन त्याची जागा पाषाण अथवा मूर्तीतून व्यक्त होणार्या देवतांची पुजा अर्चना करण्यास हिंदूंनी सुरुवात केली. सोऽहम् साधना देव मानणारा हिंदू करू शकतो.

३२. पुजा साधारणपणे तीन प्रकारच्या असतात. त्यांची विभागणी भक्ताच्या गुणानुसार होत असते. सात्त्विक भक्ताची पुजा, रजोगुणी भक्ताची पुजा तमोगुणी भक्ताची पुजा असे ते तीन प्रकार असल्याचे आढळते. सात्त्विक भक्ताची पुजा सुक्ष्म स्वरुपाची असते. विशेष करून ती मनातल्या मनात केली जाते. मन शांत ठेवून एकाग्रपणे भक्त त्याच्या आराध्य दैवताचे स्मरण करतो, किंवा त्यावर त्राटक करतो. त्याचा फारसा गाजावाजा होत नाही. कोणालाही तो पुजा करतोय हे समजतसुद्धा नाही. अशा पुजेला स्थळ, वेळ सामुग्री ह्याची आवश्यकता नसते. अशा पुजेत त्राटक क्रियेचा मोठा अंतर्भाव असू शकतो. अशी पुजा सर्वात जास्त प्रभावी असते असे समजले जाते. अशा पुजेला मानस पुजा असेंसुद्धा म्हणतात. अशी पुजा केवळ देवतेशी निगडीत असते. अशी पुजा वैयक्तिक स्वरुपाची असते. अशी पुजा सकाम किंवा निष्काम कशीही असू शकते. बौद्धांमध्ये त्राटकाची जागा विपश्यना ह्या क्रियेने घेतली. विपश्यना म्हणजे आपल्या श्र्वासोंश्र्वासावर त्राटक करणे. असे होण्याचे कारण, बुद्ध विचारांत दैवतांची पुजा मान्य नसते. असे असले तरी शेवटी बुद्धधर्मी लोक गौतमबुद्धाची मूर्ति तारका नांवाच्या देवतेची पुजा करतांना आढळतात. ह्याचा अर्थ असा होतो किं, बहुतेक मनुष्यांस कांहींतरी चिन्ह आवश्यक असते कीं, ज्यावर तो त्याचे मन एकाग्र करू शकेल. मूर्तिपुजा मानणार्या इस्लामचे अनुयायी सुद्धा अल्लाह लिहीलेले पदक अथवा एकाद्या दर्ग्याचे चित्र पुजतांना आपण पहातोच. हिंदू असा खोटेपणा बाळगता सरळपणे माणसाच्या नैसर्गिक गरजेनुसार मूर्तिपुजा करणे योग्य समजतात. येशु सात्विक पुजा प्रमाण मानतो. चर्चमध्ये होणारी सामुहीक प्रार्थना त्याला मान्य नव्हती. कारण ती रजोगुणी असते.
मनुस्मृती सातवा भाग सुरू – ६१ – ८०
कर्तबगार, प्रामाणिक, कामसु, आपल्या कामात तरबेज असें सर्व गुण पाहून त्यांची निवड होईल. ६१
जे शूर आहेत, धाडसी आहेत, तरबेज आहेत, उच्च कुळातील आहेत, आणि सचोटीने काम करणारे आहेत असें सेवक राजस्व गोळा करणे, राज्याचे संरक्षण करणे, न्याय व सुव्यवस्था पहाणे, खाणी, कारखाने, वखारी ह्यांवर नेमले जातील व तुलनेने कमी शूर, धाडसी परंतु, उच्च कुलीन असें सेवक राजवाड्याच्या कारभाराकडे नेमावेत. ६२
राजाने असें प्रतिनिधी नेमावेत जे राज्य व राजा अशा दोघांचे हित पहाणारे असतील, ते चाणाक्ष असतील ते सर्व शास्त्रात प्रवीण असतील, दुसर्याच्या चेहर्यावरून त्याच्या मनातील ओळखण्यात तरबेज आहेत आणि कुलीन आहेत. ६३
प्रतिनिधी बुद्धिमान, देखणे, बोलण्यात चतूर, राजाशी प्रामाणिक, कार्यकुशल, चांगली स्मरणशक्ति असलेले, काळवेळाचे भान राखून वागणारे, निर्भय असले पाहिजेत कारण, तो प्रसंगी राजाची जागा घेत असतो. ६४
सैन्याचा प्रमुख असा असावा किं, तो राज्याचे व राजाचे, खजिन्याचे, संरक्षण करण्यास समर्थ आहे, शांततेच्या तसेंच युद्धाच्या काळात तो सारखाच कार्यक्षम असेल. ६५
प्रतिनिधी, राजा व राज्य अशा दोघांचे प्रतिनिधीत्व राज्याबाहेर मित्र करून जोडणे व शत्रू तोडणे अशी कामे करीत असतो, इतर राजे जोडणे व शत्रुत्व कमी करणे ही कामं तो करतो. ६६
प्रतिनिधीच्या एकंदर कामात दुसर्या राजांचा अंदाज घेणे, त्यांच्या सेवकांच्या वागण्यावरून त्या त्या राजाचे अंतर्यामी उद्देश ओळखणे, स्वताच्या राजाला परराज्य धोरण ठरविण्यात मदत करणे, हेरगिरी करणे हे येतात. ६७
आपल्या प्रतिनिधींच्या सांगण्यावरून राजा इतर राजांशी कसे वागावयाचे ते धोरण आखतो. त्यामुळे भविष्यातील धोका टाळता येईल. ६८
राजाच्या राजधानीची जागा ठरवितांना, ती जागा कोरड्या हवामानाची असावी. तेथे धान्य व पाणी भरपूर मिळत असेले पाहिजे, सज्जन लोकांची वस्ती असली पाहिजे, तेथे रोगराई नसावी, वातावरण प्रसन्न असावे, जेथे त्यांचे सेवकसुद्धा व्यवस्थितपणे राहू शकतील. आणि जेथील प्रजा अनुकूल आहे. ६९
राजा त्या ठिकाणी एक नगर वसवेल, एक गढी बांधेल, ती पाण्याने अथवा वाळवंटाने वेढलेली असेल. गढी दगडाची व मातीची असेल, तिच्या भोवती त्याच्या (राजाच्या) सैन्याचा गराडा सदैव पडलेला असेल. किंवा गढी उंच डोंगरावी असेल. ७०
राजांने दूर्ग (डोंगरावरील गढी) बांधणे सर्व दृष्टीने श्रेयस्कर असेल. कारण, त्यात अनेक फायदे असतात. ७१
वर दिलेल्या प्रकारातील पहिल्या तीन प्रकारच्या गढीच्या जागांत वनचर, जलचर, बिळात रहाणारे असतात, आणि शेवटून तीन जागांत माकडे, माणसे व देव (ब्राह्मण) रहातात. ७२
असें करण्याचे कारण, शत्रू ह्या प्राण्यांना मारत नाहीत. त्यामुळे ते राजाला सुद्धा मारणार नाही. ७३ टीपः हे सर्व अंदाज खोटे ठरले त्यामुळे हिंदी राजे परचक्राच्या हल्ल्यात हरले.
एक धनुष्यधारी किल्ल्याच्या तटावर उभा असेल तर ते जमिनीवरील असलेल्या शंभर सैनिकांसारखा असतो. ७४
म्हणजे, किल्ल्याच्या तटावर शंभर सैनिक असतील तर ते जमिनीवर उभ्या असलेल्या दहा हजार सैनिकां बरोबर असते. ७५
अशा गढीच्या मध्ये राजाने त्याचा महाल बांधावा, रहाण्यास उत्तम व सुरक्षित असावा. त्यात पाण्याची सोय असावी. भिंतीना सफेद रंग असेल, आजुबाजूला गर्द झाडी असावी. ७६
एवढे झाल्यावर तो राजा त्याच्या समान वर्णाच्या कुलीन अतिसुंदर, शरीरावर उत्तम लक्षणे असलेली, उच्च घराण्यातील आणि सुस्वभावी अशा स्त्रीशी लग्न करील. ७७
राजा एक घरचा पुरोहीत नेमेल, एक रुद्वीग (राज पुरोहीत) नेमेल, ते राजाचे घरचे विधी करतील. त्यासाठी तीन यज्ञकुंड असतील त्यात बळी दिले जातील. ७८
राजा अनेक श्रौत (वैदिक विधीने युक्त) यज्ञ करील. त्या प्रित्यर्थ तो अनेक दानं करून ब्राह्मणांना संतुष्ट करील व सन्मान प्राप्त करील. ७९
राजा राजस्व (कराचा महसूल) गोळा करण्यासाठी प्रामाणिक सेवकांची नियुक्त करील. तो पवित्र शास्त्रात दिलेल्या नियमानुसार सर्व कामं करील. तो राजा सर्व प्रजेचे प्रेमळ पित्या प्रमाणे पालन करील. ८०
मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा