गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

हिंदू कोण – ७

. हिंदू मान्यतेतील देव परमेश्र्वर ह्यां बद्दलच्या कल्पना - (पुढे चालू)
. वेदांत दिलेल्या माहितीनुसार ब्रह्माने सात ऋषी कल्पनेने उत्पन्न केले त्यांना सप्तऋषी असें म्हणतात. त्या सप्तऋषींनी अनेक दुसर्या पातळीचे ऋषी त्यांच्या कल्पनेने उत्पन्न केले, हे ऋषी सुरुवातीचे पितर असें मानले जाते. कल्पनेने त्यांना उत्पन्न केले म्हणून त्यांना मानस पुत्र असें समजले जाते. असें समजतात किं, ह्या अनेक दुसर्या पातळीतील ऋषींनी पृथ्वीवरील सर्व मानव वंशांला उत्पन्न केले आहे. ब्रह्माने ह्या ऋषींना कांहीं विशेष सिद्धी (अधिकार) दिल्या त्यांच्या द्वारा ते ही सृष्टी चालवू शकतात. आणि म्हणून ते माणसासाठी पुजनीय ठरले. त्या ऋषींना विशेष सिद्धी असणार्या सर्वच अदृष्य शक्तिंना आपण दैवते असे समजतो. दुसर्या पातळीचे ऋषी देहधारी होते त्यानंतर सर्व वाढ देहधारी मानवांची होत गेली. म्हणजे मायेची उत्पत्ति त्याच सुमारास झाली असें समजावे. वेदातील पितरांची नांवे आज प्रचारात नाहीत. आज आपण ज्या नांवांने त्यांना ओळखतो ती नांवे येथे वर दिली आहेत. ह्या ठिकाणी इतर धर्मांत पुजल्या जाणार्या पितरांची नांवेसुद्धा घातली आहेत कारण, हिंदू सर्वच पितरांची याचना करण्यास मोकळे आहेत. हिंदूंतील ब्राह्मण जातीचे लोक त्यांच्या प्रभावाखालील हिंदू फक्त हिंदूस्थानातीलच पितर पुजतात. दुर्दैवाची गोष्ट अशी किं, ते भारताबाहेरील पितरांचा विनाकारण द्वेष करतात इतरांना सुद्धा तसें करण्यास सांगतात. हे वागणे मुळ हिंदू विचारसरणीच्या विरुद्ध आहे. द्वेष हा एक षड्रीपु असल्याने अशा वागण्यामुळे त्याच्या प्रार्थना बहुधा व्यर्थ जातात, ते पापमय ठरतात. निरनिराळ्या दैवतांची तुलना करणे, त्यांच्या बद्दल द्वेष, संशय बाळगणे अशी वागणूक याचकांची असेल तर त्या याचकांस कोणतेही दैवत मदत करीत नाही हे नेहमी लक्षात ठेवावे.

. पिशाच्च वर्गातील दैवते अशी, वेताळ, भैरव, म्हसोबा, मल्ल्हारी, खंडोबो, त्या माणसाचें पुर्वज, वास्तुदेव, ग्रामदेव, ब्रह्मराक्षस, ब्राह्मणदेव, समंध, देवचार, मुंजा, खविस, गिर्या, झोटींग इत्यादि, एकंदर भरकटणारी अनेक भुते ह्यांत येतात. हिंदूंतील तंत्र विज्ञानानुसार (मंत्रशास्त्र) संसारी हिंदूंनी ह्या पिशाच्चांची मनधरणी करावी ह्यांचे कारण ह्यांची मनधरणी करणे इतर देवताच्या आराधना करण्यापेक्षा कितीतरी सोपी सहजसाध्य असतें. ईश्र्वर, पितर अशा दैवतांची पुजा करणारा सात्त्विक असावा लागतो ती अट पिशाच्च पुजेत नाही. अशा ह्या तीन प्रकारात मोडणार्या देवतांच्या पुजा करण्याचे फायदे तोटे काय ते आपण नंतर पहाणार आहोत. हिंदूंतील अघोर तंत्रात विशेष करून पिशाच्च देवतांची आराधना कशी करावयाची ह्याची शिकवण दिली जाते. अघोर तंत्र हा हिंदू विचारांतील एक मोठा अति महत्वाचा असा भाग आहे पण वैदिकतेचा वारसा सांगणारे ब्राह्मण त्या महान तंत्राचासुद्धा द्वेष करतात असे आढळते. त्या कारणांने ते अघोर तंत्राबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी, खोटी माहिती असणारी पुस्तके लिहून पसरवतात. अशारितीने अघोर पंथाला ते नाहक बदनाम करीत असतात. पिशाच्च साधना करणार्यांनी मात्र एक गोष्ट चांगली ध्यानात ठेवावयाची असतें किं, ही सर्व पिशाच्च स्वतः असंतुष्ट अवस्थेत असतात त्यामुळे त्यांच्या मदतीने मिळालेले सुख-समाधान चिरकाल टिकणारे नसतें. पितर देव संतुष्ट अवस्थेत असतात म्हणून त्यांच्या मदतीने मिळणारे सुख-समाधान चिरकाल टिकणारे असू शकते. आणखीन कांहीं गोष्टी सांगावयाच्या त्या अशा, एका पितरांस याचना केली तर ती सर्वच पितरांना केल्यासारखे असते परंतु, एका पिशाच्च्यास याचना केली तर ती फक्त त्याच पिशाच्चापुरती असते. ह्यासाठी जेव्हां याचना करण्यासाठी पितर निवडावयाचा तेव्हां तो असा निवडांवा किं, ज्याची आराधना करतांना नेहमी आनंद वाटेल. त्याच प्रमाणें अधून मधून इतर पितरांनासुद्धा अर्ध्य द्यावे. अर्ध्य देण्याची सोपी पद्धत अशी, शुचिर्भूत होऊन शुचिर्भूत अशा जागी उभे राहून एका कलशात शुद्ध पाणी घेऊन तो कलश दोनही हातात धरून सावकाशपणे ते पाणी उंचावरून जमिनीवर सोडावे. पाणी सोडतांना एकेका पितराचे नांव आदरपूर्वकपणे घेऊन मग म्हणावें, "माझ्यावर तुम्ही कृपादृष्टी ठेवावी". उदाहरणार्थ, समजा तुम्ही रामास प्रमुख आराध्य दैवत म्हणून स्वीकारले आहे अशा परिस्थितीत इतर पितरांसाठी महिन्यातून एकदा (शुक्ल त्रयोदशीचा दिवस उत्तम असतो) वर दिलेला अर्ध्य विधी करावा. त्यात इतर म्हणजे ज्यांना आराध्य देवतेचा मान नाही अशांची एकेक करून नांवे घेऊन अर्ध्य करावे. उदाहरणार्थ, म्हणावें, मुसादेवा, माझ्यावर तुम्ही कृपादृष्टी ठेवावी, कृष्णदेवा, माझ्यावर तुम्ही कृपादृष्टी ठेवावी, येशुदेवा, माझ्यावर तुम्ही कृपादृष्टी ठेवावी, अहो अल्लाह माझ्यावर तुम्ही कृपादृष्टी ठेवावी, अशा प्रकारे सर्व इतर पितरांना विनंती करावी. म्हणजे उत्तम प्रतिसाद सर्व पितरांकडून मिळून कार्यसिद्धी निश्र्चत होईल. खर्या हिंदूंस हे करणे शक्य आहे पण हिंदूंतील ब्राह्मणांना त्यांच्या प्रभावाखाली असलेल्यांना मात्र, हे करणे सहज नाही कारण ते भारताबाहेरील इतर पितरांचा द्वेष करतांत. शक्य असल्यास अर्ध्य दिल्यानंतर त्यांना प्रसाद द्यावा. तो खिरीचा असावा. आराध्य दैवत इतर सर्व पितर अशा सर्वांसाठी एक एक पिंड (घास) तयार करून त्यातील आराध्य दैवताचा स्वतः खावा इतर पितरांचा कावळ्याला द्यावा. हिंदूंमध्ये निरनिराळ्या समाजांत वेगवेगळ्या पद्धतीने पितरांना नैवेद्य (प्रसाद) दिला जातो. एका पद्धतीत, नैवेद्याचे पिंड खाऊ शकणार्या फार लहान बालकांस भरवला जातो. त्याचे कारण असें सांगतात किं, असा बालक एकाद्या पवित्र आध्यात्मिक साधकापेक्षाही जास्त पवित्र असतो. असें बालक नंतर त्याच्या सभोवारच्या संस्कारामुळे बिघडत जाते त्याकारणांने नंतर तो सामान्य माणसात रुपांतरीत होतो. अशारितीने पितरांस पिंडदान केले तर ते अतिप्रसंन्न होतात असें समजले जाते. अशा लहान बालकाची हरप्रकारे सेवा करणे हे प्रत्यक्ष परमेश्र्वराची सेवा करण्या सारखे असते. कांहीं सांगतात किं, इतर पितरांचे घास (पिंड) कावळ्याला द्यावयाचा असतो कारण, कावळा हा गेल्या जन्मीचा ब्राह्मण असतो. कांहीं हिंदू गाईला देतात. कांहीं गरीब माणसांस देणे योग्य समजतात. अशा विविध परंपरा हिंदूंत आढळून येतात. अशा सर्व परंपरा सारख्याच योग्यतेच्या आहेत असें मानले जाते. ह्या सर्वांत, पितरांच्या नांवाने देणे हे महत्वाचे असते बाकीच्या गोष्टी दुय्यम असतात.
क्रमशः पुढे चालू
मनुस्मृतीचा पांचवा भाग सुरू - १११२५
जाणकार समजतात किं, धातु, रत्न, आणि दगडापासून बनवलेल्या वस्तुंची सफाई राखेने घासून नंतर पाण्याने धुवून करावयाची असते. १११
शुद्ध सोन्याचे भांडे ज्यावर डाग पडत नाहीत ते केवळ पाण्याने स्वच्छ होतात. तसेंच जे पाण्याने तयार होतात जसें, शंख, प्रवाळ, हे आणि दगडाच्या वस्तु आणि चांदीचे भांडे निव्वळ पाण्याने स्वच्छ होत नाहीत. ११२
पाणी आणि अग्नी ह्यांच्या संयोगाने चमकणार्या वस्तु जसें, सोना, चांदी त्याने शुद्ध होतात. ११३
तांबे, लोह, पितळ, शिसें, कथील, कांसे हे त्यांच्या स्वभावानुसार आंबट अथवा विम्ल द्रव्याने स्वच्छ होतात. ११४
सर्व प्रकारच्या रसांचे स्वच्थ करण्यासाठी त्यातून दोन पाती कुस गवताची फिरवावीत, घट्ट पदार्थांसाठी त्यावर पाणी शिंपावे लाकूड साफ करण्यासाठी ते घासावें. ११५
यज्ञात वापरली जाणारे पेले ज्यांतून सोमरस प्यासा जातो, ते ज्यांना कमास ग्रहास असें म्हणतात ते हातांने घासून त्यावर पाणी मारून स्वच्छ करावीत. ११६
करु शृक, शृव (चमचाचे प्रकार आहेत) गरम पाण्याने हातांने घासून साफ करावयाचे असतात. लाकडाची अवजारे, जसें, फाळ, फावडे, लाकडाची तलवार (स्फ्य), कुदळ, सुप, गाडी, आणि पाटा-वरवंटा, खलबत्ता, हे पाण्याने घासून साफ करावेत. ११७
मोठ्या आकाराच्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी त्यांवर पाणी शिंपावे, लहान गोष्टींसाठी त्या पाण्यात बुचकळून काढाव्यात त्या रीतीने साफ कराव्यात. ११८
चामड्याच्या बांबूच्या वस्तु कापड्याने पुसून साफ कराव्यात. भाज्या, कंदमुळे, फळे, धान्य पाण्यात विसळून स्वच्छ कराव्यात. ११९
रेशीम, लोकरीची वस्त्रे, साबणाने, बुरणूस रिठ्याने, आमसुपट्टे बेलफळाने, कापड पिवळ्या मोहरीच्या दळांने, १२०
जाणकार लोक गाईचा मुत पाण्याच्या मिश्रणांने शंख, शिंग, हस्तीदंत, धुवून मग कापडाने घासून साफ करतात. १२१
गवते त्यांपासून बनलेल्या वस्तु पाण्याने शिंपून, घर पुसून किंवा शेणाने सारवून, मातीची भांडी भाजून, १२२
मातीची भांडी जी दारु, मुत्र, गु, लाळ, पूं, रक्त ह्यांने खराब झाले आहे ते पुन्हा भाजून स्वच्छ होत नाही ते फोडून टाकावीत. १२३
जमीन खाली दिलेल्या पांच पद्धतींनी स्वच्छ होते, पोसा मारून, शेणाने सारवून, गाईच्या मुताचा अथवा दुधाचा सडा करून, घासून, आणि गाईला एक रात्र तेथे ठेवून. १२४
जे अन्न पक्षाने टोचल्यामुळे, गाईने हुंगल्यामुळे, पायाचा स्पर्श झाल्याने, कोणी शिंकल्यामुळे, केस पडल्यामुळे, किडे पडल्यामुळे खराब झाले आहे ते मातीत टाकून द्यावे. १२५

मनुस्मृतीचा पांचवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा