शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

हिंदू कोण – ८

. हिंदू मान्यतेतील देव परमेश्र्वर ह्यां बद्दलच्या कल्पना - (पुढे चालू)

१०. निरनिराळ्या देवतांना जे नैवेद्य दिले जातात ते खाण्याबद्दल कांहीं संकेत आहेत ते असें, परमेश्र्वर पितर ह्याना दिलेला नैवेद्य-प्रसाद यजमानाने आणि कोण्या योग्य व्यक्तिस खाण्यास द्यावा. पिशाच्चांना दिलेला नैवेद्य मात्र दहाही (दहा दिशा अशा, पूर्व, ईशान्य, उत्तर, वायव्य, पश्र्चिम, नैऋत्य, दक्षिण, आग्नेय, वर, खाली) दिशांना थोडाथोडा फेकून द्यावयाचा असतो. भरकटणार्या भुतांस दिलेला नैवेद्य चार रस्त्यांच्या मधोमध ठेवावयाचा असतो अथवा उकीरड्यावर ठेवावयाचा असतो. ह्याचे मोठे शास्त्र असून तो विषय ह्या लेखाच्या आवाक्या बाहेरचा आहे म्हणून त्यावर जास्त लिहीत नाही.
११. इतर धर्म हिंदू मान्यता ह्यांतील फरकाची कारणे काय ते पहावे लागेल. ह्या ठिकाणी इतर धर्मांत प्रामुख्याने ख्रिस्ती धर्म इस्लाम ह्यांचाच विचार केलेला आहे कारण, त्यांच्याच अनुयायांना बहुतेक करून आपल्याला सामोरी जावे लागते. इतर धर्मांत परमेश्र्वरा कडे थेट विनवणी (त्याचे प्रापंचिक प्रश्र्न सोडविण्यासाठी) करण्याची प्रथा असतें. हिंदूंत तसें नसते कारण असें समजले जाते किं, अशारितीने माणसांचे संसारातील काम होण्यास विलंब लागतो. परस्पर संबंधित देवाकडे याचना करण्यामुळे माणसाचे काम तुलनेने लवकर होत असतें. त्यातसुद्धा त्या कामे होण्याच्या विलंबात निरनिराळ्या प्रकारच्या देवतांत फरक असतो. तो असा, परमेश्र्वराला याचना केली किं ती तो पहात नाही तर ती विनंती त्या याचनेशी संबंधित प्रमुख देवतेकडे पाठवली जाते. तेथून ती याचना त्या खालील देवतेकडे तेथून आणखीन खाली अशारितीने शेवटी प्रत्यक्ष संबंधित देवतेकडे येते नंतर ती विनंती योग्य आहे कीं नाही त्याचा विचार होतो जर योग्य आहे असें असेल तर ती मान्य होते. याचनेची यथायोग्यता ती याचना करणार्याच्या अध्यात्मिक योग्यतेनुसार ठरवली जाते. ह्या लांबवणार्या प्रक्रीयेमुळे परमेश्र्वराकडे केलेला अर्ज मंजूर होण्यास नेहमीच फार वेळ लागत असतो. त्याशिवाय परमेश्र्वराकडे अर्जी करण्यासाठी याचकाला त्या योग्यतेचे असावे लागते. जर तो त्या उच्च अध्यात्मिक अवस्थेचा नसेल तर त्याच्या प्रार्थनेची (अर्जाची) साधी दखलसुद्धा घेतली जात नाही. ही अडचण पितरांच्या अथवा पिशाच्चांच्या बाबत नसते. हे सर्व आपल्या हिंदू पूर्वजांना समजले होते म्हणून त्यांनी परमेश्र्वराच्या प्रार्थनेहून जास्त महत्व पितर पिशाच्च ह्यांच्या पुजनांकडे दिले असावें. कारण, साधारण माणूस तितक्या उच्च पातळीचा असूंच शकत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो किं, अध्यात्मिक लायकी नसलेल्या माणसांने परमेक्श्र्वराची अथवा ईश्र्वराची याचना केली तर ती बहुतेक करून फुकट जाते. अशा कारणांनी इतर धर्मातील लोकांच्या बर्याच याचना व्यर्थ जातात हिंदूंच्या याचना योग्य पातळीच्या देवतेकडे असतील तर फुकट जात नाही. ह्यावर तोडगा म्हणून पुरोहितांनी याचकासाठी त्याचा प्रतिनिधी बनून देवतेकडे याचना करण्याचा धंदा सुरू केला तो आज चांगल्यापैकी चालत असल्याचे दिसते. ह्या तोडग्याच्या प्रभावामुळे ब्राह्मण पुरोहितांनी सामान्य हिंदूंचा ताबा घेतला. येथे प्रश्र्न असे येतात, काय हे पुरोहित खरोखरच आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ असतात कां? अशा दलालाने केलेली अर्जी देवता खरोखरच स्वीकारतात कां? हे प्रश्र्न जरी अजून अनुत्तरित असले तरीसुद्धा, हा धंदा सर्वच धर्मांत तेजीत चालतोय.
पुढे चालू –
मनुस्मृतीचा पांचवा भाग सुरू - १२६ – १३७
दुर्गंधी व डाग जात नाहीत तोवर अशा निर्जीव गोष्टी माती व पाण्याने घासून साफ कराव्यात. १२६
देव तीन गोष्टी ब्रह्मासाठी शुद्ध समजतात, ज्यावर डाग नाहीत, जी पाण्याने स्वच्छ केलेली आहे व जिला ब्रह्म शुद्ध मानते. १२७
जे पाणी गाईची तहान भागवते, ज्या पाण्याला वास येत नाही, रंगहीन आहे, कोणताही अशुद्ध पदार्थ त्यात मिसळलेला नाही व चांगल्या जमिनीतून मिळते ते शुद्ध पाणी समजावे. १२८
कारागिराचे हात नेहमी स्वच्छ असावेत, बाजारात विकावयास आलेली वस्तू शुद्ध समजावी, भिक्षा मागून मिळवलेले अन्न शुद्ध समजावे. असा मान्यवर नियम आहे. १२९
बाईचे तोंड शुद्ध समजावे, पक्षाने पाडलेले फळ शुद्ध समजावे, गाईला दुध सुटले तर तिचे वासरू शुद्ध समजावे, जो कुत्रा हरीण पकडतो तो शुद्ध समजावा. १३०
मनु सांगतो किं, कुत्र्याने मारलेले सावज, मांसाहारी प्राण्याने मारलेले भक्ष्य व हलक्या कुळातील माणसाने मारलेली शिकार शुद्ध समजून ब्राह्मणाने तिचा स्वीकार करावा. १३१
बेंबी खालील सर्व मोकळ्या जागा अशुद्ध समजाव्यात व वरील सर्व शुद्ध समजाव्यात. १३२
माशा, पाण्याचा थेंब, गाय, घोडा, सूर्याचे किरण, धूळ, माती, वारा, आणि अग्नी हे स्पर्शापलिकडले समजावेत. १३३
शरीराच्या ज्या अवयवातून शरीरातील मळ बाहेर टाकला जातो ते स्वच्छ करण्यासाठी पाणी व माती उपयोगात आणावी. त्याच प्रमाणे इतर बारा मळ साफ करण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर करावा. १३४
तेलकट उत्सर्जने, वीर्य, रक्त, मेंदूतील स्निग्ध उत्सर्जने, मुत्र, विष्ठा, नाकातील शेंबूड, कानातील मळ, अश्रु, खकारा, डोळ्यातील मळ, आणि घाम अशी ही बारा अशुद्धे शरीरातून बाहेर टाकली जातात. त्यामुळे शरीर शुद्ध रहाते. १३५
जो ब्राह्मण स्वताला शुद्ध करू इच्छितो त्याने गुदद्वार स्वच्छ करण्यासाठी मातीचा उपयोग करावा. मातीने तिनदा घासून ते साफ करावे. त्यासाठी फक्त डाव्या हाताच्या पंजा वापरावा. त्यानंतर डाव्या हाताने पाण्याने दहा वेळा व दोनही हाताच्या पंजाने सात वेळा घासून साफ करावे. १३६
हे गृहस्थासाठी, विद्यार्थ्याने त्यापेक्षा दुप्पट वेळा, बैरागी व संन्यासी ह्यांनी तिप्पट वाळा घासावे. १३७
मनुस्मृतीचा पांचवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा