बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

हिंदू कोण - ५

मागील पोस्ट पासून चालू -
. हिंदू मान्यतेतील देव परमेश्र्वर ह्यां बद्दलच्या कल्पना - (पुढे चालू)
. मनुस्मृतीत पहिल्या भागांत विश्र्व कसे उत्पन्न झाले ते सांगितले आहे. तरीसुद्धा परमेश्र्वराने ही सृष्टी त्याच्या प्रेरणेने उत्पन्न केली असे समजून त्या नंतर पुढच्या गोष्टींचा विचार इतर धर्मांत केलेला आढळून येतो. म्हणजे परमेश्र्वराने त्याच्या पासून थेट सृष्टी उत्पन्न केली असे साधारणपणे समजले जाते. त्यांच्यात जास्त खोलात जाणे आवश्यक समजले जात नाही परंतु, हिंदू विचारानुसार तसें मानले जात नाही. हिंदू विचारांत परमेश्र्वरांने सुरुवातीस कांहीं देवता प्रथम उत्पन्न केल्या व त्यांना सृष्टी उत्पन्न करण्याचे काम सोपवले असें समजले जाते. ह्या देवतां अनेक आहेत जसें, एकाद्या कंपनीत मालका खालोखाल अनेक अधिकारी असतात तसेंच साधारणपणे आहे, असें हिंदूंत समजले जाते. त्यामुळे एक परमेश्र्वर व अनेक देवता अशी रचना असल्याचे मानले जाते जसें एक मालक व अनेक अधिकारी. कांहीं ठिकाणी देवतांना ऋषी असा शब्द वापरलेला आहे. ऋषी म्हणजे द्रष्टा अथवा असा, जो सर्वकांही पाहू शकतो.

. आता सवाल येतो तो ह्या देवतांच्या पुजनाबद्दलचा. मुळात त्यांना कां पुजावयाचे हा प्रश्र्न उपस्थित होतो. असा विश्र्वास सर्वमान्य आहे किं, त्यांच्याकडे माणसाचे जीवन सुखी समृद्ध करण्याच्या सिद्धी असतात. कांहीं हिंदू तसें मानत नाहीत त्याना नास्तिक हिंदू समजले जाते. ते नास्तिक ह्या देवतांची पुजा करीत नाहीत. हिंदूंच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार माणूस दोन प्रकारचे असल्याचे मानले जाते. एक असा माणूस ज्याला परमेश्र्वराला पहावयाचे, त्याच्यात एकरूप होण्याची इच्छा असलेला असा आहे त्याला मोक्षार्थी असें म्हणतात दुसरा असा माणूस, ज्याला जीवनातील सुख, समृद्धि, यश, किर्ति, सन्मान, सत्ता, सामर्थ्य, वैभव अशा वास्तविक गोष्टींचा भोग घेणे हे परमेश्र्वर प्राप्तिपेक्षा जास्त महत्वाचे वाटते अशा माणसास प्रापंचिक असें समजतात. ज्याला परमेश्र्वर प्राप्ति महत्वाची वाटते त्याने परमेश्र्वराची अथवा ईश्र्वराची आराधना करावी ज्याला सुख, समृद्धि अशा वास्तविक गोष्टी परमेश्र्वरापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात त्यांने देवतांची आराधना करावी असे साधारणपणे समजले जाते. ह्या ठिकाणी हे स्पष्टपणे दिसून येते किं, इतर धर्मांत माणसांने फक्त मोक्षार्थी असावे अशी अपेक्षा धरलेली असते हिंदूंत मोक्षार्थी प्रापंचिक अशा दोनही प्रकारच्या भक्तांचा विचार केलेला आहे असें दिसते. ब्राह्मणांच्या सनातन धर्मात सुद्धा माणूस फक्त मोक्षार्थी असावा अशी भुमिका आहे. सर्व हिंदू चार गोष्टी मानतात आणि जर मानत नसेल तर तो इसम हिंदू समजला जात नाही. त्या चार गोष्टी अशा, तो पुनर्जन्म मानतो, तो अद्वैत सिद्धांत मानतो, तो कर्मविपाकाचा सिद्धांत मानतो तो शक्तिसातत्याचा सिद्धांत मानतो. ह्या चार मुलभूत सिद्धांताबद्दल अधिक माहिती आपण पुढे करून घेणार आहोत. बहुतेक हिंदू आज जन्माने हिंदू आहेत त्यांना कदाचित हे चार मुलभूत सिद्धांत माहीत नसतील तर ते त्याने समजून घ्यावेत म्हणजे तो त्याच्या हिंदू मान्यता विशेष जागरुकपणे आचरणात आणू शकेल. ह्या विवेचनातून हे स्पष्ट होते किं, देव मानणे अथवा मानणे हिंदू ठरण्यासाठी आवश्यक नसते.
. हिंदूंतील परमेश्र्वर ईश्र्वर हे दोन प्रकार पाहिले, त्याशिवाय आणखीन दोन उपप्रकारसुद्धा हिंदू पुजतात ते, पितर पिशाच्च असें आहेत. मनुस्मृतीत पितरांच्या पुजेचे महत्व स्वीकारलेले आढळते परंतु पिशाच्च पुजेचा विचार केलेला दिसत नाही. ह्यांचे कारण, पिशाच्च पुजा विशेष करून क्षत्रिय, वैश्य शुद्र वर्णांतील माणसे करतात. मनुस्मृतीत केवळ ब्राह्मण वर्णाच्या लोकांचा विशेष करून विचार केलेला आहे. तसेंच वैदिक काळांत पितरांच्या पुजेत पिशाच्च पुजा गृहीत धरलेली होती. येथे आपण पाहतो किं, ही विविध दैवते एकाच योग्यतेची नाहीत, परमेश्र्वर सर्वोच्च योग्यतेचा असून पिशाच्च दैवते सर्वात खालच्या योग्यतेची आहेत. त्या प्रत्येकांचे विशेष अधिकार (सिद्धी) मर्यादा निश्र्चित असतात. भाविकांने आपल्या लायकीच्या योग्यतेच्या देवतेची आराधना करावी अशी अपेक्षा असते. अदृष्य निसर्गातील देवता गणांची माहिती आपण नंतर पहाणार आहोत. इतर धर्मांत एकाच देवाची आराधना करण्याचा आग्रह असतो. परंतु, जर योग्यता नसेल तर त्या अतिउच्च देवाची (अल्लाह, गॉड, परमेश्र्वर) आराधना व्यर्थ जाते हे लक्षात घेतलेले दिसत नाही. फारच थोडे लोक सात्त्विक असतात, सर्वसाधारण माणूस रजो अथवा तमो अवस्थेतील असतो त्यांने कितीही प्रार्थना त्या अतिउच्च देवाची केली तरी ती त्याच्यापर्यंत पोहोचल्यामुळे ती प्रार्थना फुकट जाते. ह्याचा अर्थ हे धर्म सामान्य माणसांस मदत करीत नाहीत. हिंदूंमध्ये सर्व योग्यतेची दैवते उपासनासाठी उपलब्ध असल्याने तो सर्व योग्यतेच्या माणसांस उपयोगी ठरतो. ह्याकारणांने हिंदू विचार सामान्य माणसासाठी, इतर धर्मांपेक्षा जास्त हितकारक ठरतो.
क्रमशः पुढे चालू -

मनुस्मृतीचा पांचवा भाग सुरू -
जर सहाध्यायी मेला तर स्मृतीच्या परंपरेनुसार एक दिवसाचे सुतक पाळावे. जन्मानंतर समानोदकांनी (सख्खा भा, बहीण) तीन दिवस पाळावे. ७१
मुलीचे लग्नाचे ठरवले आहे परंतु, लग्न झालेले नाही असें असेल तर त्या मुलास या कुटूंबास तीन दिवसाचे सुतक असते. त्याच प्रमाणे, आईच्या बाजूच्या नातेवाईकांस तितकेंच दिवस सुतक असते. ७२
सुतकाच्या काळात स्वादिष्ट खाद्यपदार्थ, रुचकर मांस, मासळी असें भोगकारक खाद्य खावयाचे नसतात कारण, तो दुखवट्याचा काळ समजला जातो. रात्री वेगळे झोपावे संभोग घेऊ नये. ७३
येथे दिलेले सुतकाचे नियम त्या नातेवाईकांस लागू होतात जे त्याच्या जवळ रहातात. सपिंड, समनोदक (सख्खे) ह्यांच्यासाठी जर ते दूर रहात असतील तर काय करावयाचे आता पाहू. ७४
दूर देशी रहाणार्या नातेवाईकांस मृत्यूच्या दहा दिवसांत ती वार्ता कळली तर कळल्या दिवसापासून दहा दिवस सुतक पाळावे. ७५
दहा दिवसानंतर समजली तर फक्त तीन दिवस सुतक पाळावे. एक वर्षानंतर समजले तर वार्ता समजल्यावर अभ्यांगस्नान करावे म्हणजे सुतक जाते. ७६
सपिंडाच्या मरणानंतर अथवा जन्माच्या दहा दिवसांत समजले तर नेसल्या वस्त्रांनिशी त्यांने स्नान करावे म्हणजे, सुतक सुयेर संपते. ७७
नेसत्या वस्त्रानिशी आंघोळ केल्याने दूर देशी मेलेल्या सपिंड नसलेल्या नातेवाईकांमुळे येणारे सुतक संपते. ७८
सुतक अथवा सुयेर चालू असतांना आणखीन एक मृत्यू अथवा जन्म झाला तर पहिल्याच्याच काळात ते धरून ते संपल्यावर सर्व संपले असें समजावे. ७९
असा नियम आपे किं, स्नातकाचे आचार्य वारले तर तीन दिवस सुतक पाळावे. त्याची पत्नी अथवा मुल वारले तर स्नातकांनी एक दिवस-रात्रीचे पाळावे. ८०
स्रोत्रिय जो आपुलकीमुळे बरोबर रहातो तो मेला तर तीन दिवस पाळावे, आईकडील मामा, विद्यार्थी, पुरोहित असें मेले तर दोन दिवस-रात्र सुतक पाळावे. ८१
ज्या राज्यात तो ब्राह्मण रहातो त्या राज्याचा राजा मेला तर त्या दिवसापुरते सुतक पाळावे. मित्र मेला जो स्रात्रीय नाही तर मात्र एक दिवस पाळावे. तसेंच गुरू जो वेद आणि वेदांग जाणतो त्याचे सुतक ब्राह्मण एक दिवस पाळील. ८२
ब्राह्मण दहा दिवसांत सुद्ध होतो, क्षत्रिय बारा दिवसांत, वैश्य पंधरा दिवसांत आणि शूद्र एक महीन्यात शुद्ध होतो. ८३
विनाकारण सुतकराचा काळ वाढवू नये. पवित्र अग्नीवर होत असलेले संस्कार (विधी) मध्येच थांबवू नयेत. कारण, अग्नीहोत्र सांभाळणारा ब्राह्मण कधीही सुतक सुयेरात जात नाही मग तो कितीही सपिंड असेल. म्हणजे अशा ब्राह्मणाला कधीही सुयेर सुतक लागत नाही. ८४
चांडाळ, ऋतुस्नात महिला, बहिष्कृत माणूस, बाळंतीण, प्रेत, अशांना स्पर्श झाल्याने जी अशुद्धता प्राप्त होते ती आंघोळ करून जाते. ८५
आचमन करून शुद्ध झालेला ब्राह्मण जर कोण्या अशुद्ध गोष्टीकडे पाहील तर त्यांने सुर्यावरील अथवा पवमणी कवने जी पवित्र शास्त्रात दिली आहेत ती पुटपुटावी. ८६
माणसाच्या चरबी चिकटलेल्या हाडांस ब्राह्मणानी स्पर्श केला तर त्यापासून येणारी अशुद्धता आंघोळ करून संपते. चरबी नसलेल्या माणसाच्या हाडांस स्पर्श झाला तर गाईला स्पर्श करून अथवा सूर्याकडे पाहून ती संपते, तो शुद्ध होतो. ८७
जो ब्राह्मण व्रतस्थ आहे तो मृतावर अर्ध्य सोडणार नाही, पाणी शिंपणार नाही. व्रत संपल्यावर मात्र तो मृतासाठी अर्ध्य सोडेल तीन दिवसाचे सुतक पाळील. ८८
प्रेतावर पाणी सोडण्याचा विधी पाणी पाजण्याचा विधी कांहीं प्रकारच्या इसमांसाठी सांगितलेला आहे ते इसम असें, आयुष्य निरर्थकपणे व्यतीत केलेला, मिश्र जातीचा, संन्याशी ज्यांनी आत्महत्त्या केली आहे. ८९
बायकांत जी नास्तिक होती, व्यभिचारी होती, जिने गर्भपात केला आहे, जिने स्वताच्या नवर्यास ठार मारले आणि जी नशा करीत असें. ९०
टीपः मेल्यानंतर आप्तांनी सुतक कां पाळावे ह्याबद्दल कोणतीही माहिती हिंदूंच्या कोणत्याही ग्रंथात दिलेली नाही. तसेंच मुल जन्मल्यानंतर सुयेर कां पाळावे त्याची माहितीसुद्धा दिलेली नाही. सुतक सुयेर ह्या काळात देवांची पुजा करावयाची नसते असे सांगतात, त्याबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही.

मनुस्मृतीचा पांचवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा