बुधवार, १३ एप्रिल, २०१६

करावे तसें भरावे

कांहीं वर्षापूर्वी काळूबाईच्या देवस्थानी एक अपघात झाला होता. त्यावेळी अनेक माणसे मृत्युमुखी पडली होती. काळूबाईच्या देवळाला एका ठिकाणी भाविकांनी त्यांच्या इच्छा लिहीलेल्या चिठ्या ठेवलेल्या होत्या. देवळाची साफसफाई करण्याच्या कामांत पोलीसांनी त्या सर्व चिठ्या जमा करून उघडल्या त्यांचे वाचन पंचांसमोर सुरु झाले.
त्यांतील ८० टक्के चिठ्यांत ज्या मागण्या केल्या होत्या त्या वाचून तेथे जमलेले सर्वजण आश्र्चर्यचकीत झाले. त्याचे कारण, तसेंच होते. त्या चिठ्यांत भाविकांनी स्वतःसाठी कांहींही मागितले नव्हते तर उलट दुसर्यांचे वाईट व्हावे अशा मागण्या केल्या होत्या.
शेजार्याचे शेत जळून जावें, त्याच्या विहीरीचे पाणी आटून जावे, अमुक कोण्याचा वंश नष्ट व्हावा, अमुक कोण्याच्या घराला आग लागू दे, अमुक कोण्याच्या अंगात किडी पडोत, अमुक कोण्याची सून वांझ हो, अमुक कोण्याच्या शेताला आग लागो, अमुक कोणाचा बैल मरो, अमुक कोणाचे नुकतच जन्मलेलं मुल मरो, अमुक कोणाचा धंदा बरबाद हो, अमुक कोण्याच्या मुलाला नोकरी मिळू देऊ नको, अमुक कोणाचा न्यायालयात रुजू असलेला खटला तो हरो. अमुक कोणाचा सत्यानाश हो. अशा पापमुलक मागण्यानी त्या चिठ्या भरलेल्या होत्या. देवाच्या दारी जाऊन काय मागावे तर हे असें!
अशा भयानक मागण्या मागणारे भक्त महाराष्ट्रातील सर्वच देवस्थानी जाऊन अशाच मागण्या करीत असतील असें समजण्यास हरकत नाही.
जे भाविक काळूबाईकडे जातात तेंच पंढरपूरला विठ्ठलाकडे सुद्धा वारकरी म्हणून जातात. अर्थात तेथे सुद्धा हे भक्त अशाच प्रकारच्या मागण्या करीत असणार हे आपण समजू शकतो. दुसर्याच्या वायटांत आनंद मानणारे हे भाविक दुसरे काय मांगणार?
वेळोवेळी अशा पापमुलक मांगण्या देवांकडे जात असल्याने शेवटी देवांनी त्या त्यांच्या भाविकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा मानस केला असावा म्हणूनच आज कांहीं वर्षे आपल्या येथे दुष्काळाची परिस्थिती सतत राहिलेली आहे. जे मांगाल ते मिळे ह्या न्यायांने देव वागत आहेत असें वाटते.
मला वाटते मराठी माणसांने अंतर्मुख होऊन ह्याचा विचार केला पाहिजे. नाहीतर आपल्याकडे नेहमीच दुष्काळ कायमचाच राहिल!

आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लोक २३१- २५० वाचू या.
जे कांहीं, ब्राह्मणांना आवडते ते सर्व, खाण्यास देण्याचा त्यांचा प्रयत्न असला पाहिजे. आदिदैवतांना वेदातील कोडी आवडतात म्हणून त्यांची चर्चा जेवतांना चालू ठेवावी. त्यातून आमंत्रित ब्राह्मणांचे ज्ञान समजते. असे केल्याने आदिदैवते संतुष्ट होतात. २३१
अशा प्रसंगी यजमानाने आदिदैवतांच्या सन्मानार्थ वेदाचे वाचन (पठण), पवित्र नियमांची उजळणी, दंतकथा सांगणे, पुराणाचे वाचन किल (वैदिक परंपरांची चर्चा) ह्यांचे आयोजन करावे. २३२
यजमान संतुष्ट झाल्याने त्यांने ब्राह्मणांनासुद्धा मोठ्या आदराने रुचकर खाण्यापिण्याची मेजवानी देऊन संतुष्ट करावे. २३३
यजमानाने आपल्या मुलीच्या मुलास, जरी तो विद्यार्थी असला तरी बोलवावे. सर्व आमंत्रितांच्या आसनावर गाद्या लावून ती सुशोभित करावीत, तसेंच तीळाच्या दाण्यांचा सडा पसरावा. २३४
श्राद्धात शुद्धता आणण्यासाठी तीन गोष्टी करणे जरुरीचे असते, त्या अशा, मुलीच्या मुलांस बोलावणे, पाटावर गादी घालणे जमिनीवर तीळाचा सडा करणे, ह्यामुळे ज्या शुद्धीच्या गोष्टी होतात त्या क्रमशः अशा, क्रोधाचे नियमन, स्वच्छता, घाईगर्दी टाळणे. २३५
जेवणाचे खाद्यपदार्थ ताजे गरमागरम असावेत, शांतपणे जेवावयाचे असते वाढलेल्या खाद्य पदार्था बद्दल चांगले वाईट बोलावयाचे नाही. २३६
जोवर खाद्यपदार्थ गरमागरम आहेत, शांतपणे मंडळी जेवत आहेत, वाढलेल्या जेवणावर टीकाटीपणा होत नाही तोवरच फक्त पितर तेथे त्या सोहळ्यात भाग घेतात हे तक्षात ठेवावे. २३७
जेवण जेवणारा जर तोंड झाकून जेवत असेल, चेहरा खाली मान घालून जेवत असेल, तसेंच पायात पादत्राणे घालूनच जेवणांस बसला असेल तर त्याचे जेवण आदिदैवतांच्या ऐवजी राक्षस खातात असे समजावे. २३८ टीपः पुढील काळात ब्राह्मणांऐवजी गायीला अथवा कावळ्याला जेवण देण्याचा प्रघात पडला कारण, कावळा गाय अथवा बैल हे गेल्या जन्मीचे ब्राह्मण असतात असा समज आहे.
चांडाळ, डुक्कर, कोंबडा, कुत्रा, वयात आलेली स्त्री आणि नपुसक ह्यांनी त्या ब्राह्मणांना जेवतांना पाहू नये. २३९ टीपः मनुस्मृतीकाराचा स्त्रीयांबद्दचा तिरस्कार ह्यातून व्यक्त होतोय.
ह्याचे कारण, जर ह्यांनी ब्राह्मणाना अर्ध्य देतांना, भेटवस्तु देतांना जेवतांना पाहिले तर अपेक्षित फळ मिळत नाही. २४०
डुकराने वास घेतला, कोंबड्याने पंख फडफडवले तर, कुत्र्याने अन्नावर नजर टाकली तर, हलक्या वर्णाच्या माणसांने अन्नाला स्पर्श केला तर, २४१
लंगडा, एक डोळा असलेला, अपंग, अवयव नसलेला, असें जरी त्या घरातील असले तरी त्यांना त्या जेवणाच्या जागेतून दूर रहाण्यास सांगावे. २४२
घरातील ब्राह्मण रहिवासी अथवा संन्यासी जर त्यावेळी आले तर आमंत्रित ब्राह्मणांच्या परवानगीने त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना जेवणात भाग घेण्याची विनंती करावी. २४३
आमंत्रितांची जेवणे उरकल्यावर यजमानाने उरलेले अन्न एकत्र करून त्यावर पाण्याचे अर्ध्य देऊन मग ते सर्व अन्न जमिनीवर कुस गवताच्या हत्रीवर पसरून त्या ब्राह्मणांच्या पुढे ठेवावे. २४४
ताटात उरलेले खरकटे हे कुस गवतावर पसरलेले खाद्यपदार्थ मृत लहान मुलं, ज्यांना मरणानंतर यथोचित अग्नीसंस्कार मिळालेला नाही, ज्याने स्वताच्या पत्नीवर अन्याय केला आहे अशा मृत पूर्वजांना मिळतात. २४५
जेवतांना वाढतांना जे अन्न जमिनीवर सांडते ते पितरांना मिळत नाही तर तें त्या घराच्या प्रामाणिक परंतु आता मृत असलेल्या सेवकांस मिळते. २४६
सपिंडांचे श्राद्ध करण्या आधी नुकत्याच देवाज्ञा झालेल्या ब्राह्मणांस एक पिंड देवांना प्रसाद देण्याच्या आधी द्यावे. २४७
पवित्र नियमांप्रमाणे, आपल्या मृत पित्याचे सपिंडकरण उरकल्या नंतर वर सांगितलेल्या सर्व विधी कराव्यात. २४८
श्राद्धाचे जेवण खाल्यावर उरलेले जेवणाचे पदार्थ जो देतो तो मूर्ख ठरतो कारण, असें केल्याने तो कालसुत्र नांवाच्या नरकांत पडतो. २४९
जर श्राद्धाच्या जेवणानंतर ते खाणारा ब्राह्मण त्याच दिवशी शुद्र स्त्रीशी समागम करील तर त्याचे पूर्वज त्या स्त्रीच्या वीष्टेत अडकतील. २५० टीपः हे दोन सांगून मनुस्मृतीकार एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे असे दिसते.



पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा