मंगळवार, १ मार्च, २०१६

हिंदू मान्यतेतील देव व परमेश्र्वर ह्याबद्दलच्या कल्पना

इतर धर्म आपला हिंदूधर्म ह्यात एक मोठा फरक आढळून येतो तो हा किं, इतर धर्मांत एक परमेश्र्वर असल्याचे मानले जाते त्याउलट आपल्या हिंदूधर्मात एक परमेश्र्वर त्या बरोबर अनेक देव देवता असल्याचे मानले जाते. अशी अनेक देवता मानण्याची प्रथा कां प्रचारात आली ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावयाचे आहे. त्यासाठी प्रथम आपल्याला परमेश्र्वर देव-देवता ह्यांतील भेद समजून घ्यावा लागतो. असा संकेत आहे किं, हे विश्र्व परमेश्र्वराने त्याच्या विचारांतून उत्पन्न केले आहे. कांहीं म्हणतात किं, हे विश्र्व हे ह्या परमेश्र्वराचे एक स्वप्न आहे. असो.
परमेश्र्वराच्या आधी काय? असा प्रश्र्न इतर धर्मांत कोणीही विचारलेला आढळत नाही परंतु, हिंदू विचारांत हा प्रश्र्न उपनिषदांत विचारलेला आढळतो. त्याला उत्तर म्हणून नेती...नेती... नेती असें उत्तर दिलेले आढळते. नेती, ह्याचा अर्थ माहीत नाही, असा आहे. म्हणजे परमेश्र्वर ही माणसाच्या ज्ञानाची अंतिम मर्यादा ठरते. परमेश्र्वर हा शब्द परम् ईश्र्वर अशा दोन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजे ईश्र्वराच्याही पलिकडील असा त्याचा अर्थ होतो. इतर धर्मांत ईश्र्वर परमेश्र्वर हे एकच असें धरलेले आढळते. हिंदूं विचारात मात्र ईश्र्वर ह्या पातळीवर ब्रह्मदेव, विष्णु शंकर असे तीन असल्याचे मानले जाते. जो ह्या तिनाहूनही पलिकडला तो परमेश्र्वर असे समजतात. हिंदूंत दोन विभाग आहेत त्यातील एकास वैदिक विभाग दुसर्याला शाक्त विभाग असे मानले जाते. शाक्त मान्यतेनुसार शक्ति परमेश्र्वराच्या बरोबरीची असें मानले जाते. मनुस्मृतीत परमेश्र्वराला स्वयंभु असे म्हणतात. स्वयंभु म्हणजे स्वतःच्या प्रेरणेने स्वतःच उत्पन्न होणारे.
परमेश्र्वराने ही सृष्टी त्याच्या प्रेरणेने उत्पन्न केली असे समजून त्या नंतर पुढच्या गोष्टींचा विचार इतर धर्मांत केलेला आढळून येतो. म्हणजे परमेश्र्वराने त्याच्या पासून थेट सृष्टी उत्पन्न केली असे साधारणपणे समजले जाते. त्यांच्यात जास्त खोलात जाणे आवश्यक समजले जात नाही परंतु, हिंदू विचारानुसार तसें मानले जात नाही. हिंदू विचारांत परमेश्र्वरांने सुरुवातीस कांहीं देवता प्रथम उत्पन्न केल्या त्यांना सृष्टी उत्पन्न करण्याचे काम सोपवले असें समजले जाते. ह्या देवतां अनेक आहेत जसें एकाद्या कंपनीत मालका खालोखाल अनेक अधिकारी असतात तसेंच साधारणपणे आहे असें हिंदूंत समजले जाते. त्यामुळे एक परमेश्र्वर अनेक देवता अशी रचना असल्याचे मानले जाते.
आता सवाल येतो तो ह्या देवतांच्या पुजनाबद्दलचा. हिंदूंच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार माणूस दोन प्रकारचे असल्याचे मानले जाते. एक असा माणूस ज्याला परमेश्र्वराला पहावयाचे, त्याच्यात एकरूप होण्याची इच्छा असलेले असा आहे त्याला मोक्षार्थी असें म्हणतात दुसरा असा माणूस, ज्याला जीवनातील सुख, समृद्धि अशा गोष्टींचा भोग घेणे हे परमेश्र्वर प्राप्तिपेक्षा जास्त महत्वाचे वाटते अशा माणसास प्रापंचिक असें समजतात. ज्याला परमेश्र्वर प्राप्ति महत्वाची वाटते तो परमेश्र्वराची आराधना करतो ज्याला सुख, समृद्धि अशा वास्तविक गोष्टी परमेश्र्वरापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात तो देवतांची आराधना करतो.
ह्या ठिकाणी हे स्पष्टपणे दिसून येते किं, इतर धर्मांत माणसांने फक्त मोक्षार्थी असावे अशी अपेक्षा धरलेली असते हिंदूंत मोक्षार्थी प्रापंचिक अशा दोनही प्रकारच्या भक्तांचा विचार केलेला आहे असें दिसते.

हिंदूंतील परमेश्र्वर देवता हे दोन प्रकार पाहिले त्याशिवाय आणखीन दोन उपप्रकारसुद्धा हिंदू पुजतात. ते असें, पितर पिशाच्च आहेत. मनुस्मृतीत पितरांच्या पुजेचे महत्व स्विकारलेले आढळते परंतु पिशाच्च पुजेचा विचार केलेला दिसत नाही. ह्यांचे कारण, पिशाच्च पुजा विशेष करून वैश्य शुद्र वर्णांतील माणसे करतात. मनुस्मृतीत केवळ ब्राह्मण वर्णाच्या लोकांचा विशेष करून विचार केलेला आहे. तसेंच वैदिक काळांत पितरांच्या पुजेत पिशाच्च पुजा गृहीत धरलेली होती.
शेवटी आपण ह्या चार प्रकारात येणार्या विविध देवतांची हल्ली माहीत असलेली नांवे उदाहरणा करतां पाहूया. वैदिक काळात जी नांवे प्रचलित होती ती आज प्रचारात नाहीत.
परमेश्र्वर वर्गात येणारी दैवते अशी, ब्रह्मदेव, सत्यनारायण, काली तिची अनेक रुपे, शीव त्याची अलेक रुपे, गणपती, मारुती आहेत.
पितर वर्गात येणारी दैवते अशी, राम, कृष्ण, दत्त, नवनाथ, पांडुरंग, महावीर, गौतम बुद्ध, साईबाबा, अक्कलकोट बाबा, यक्षिणी, गजानन महाराज तत्सम अनेक अवतारी इतर साधुपुरुष आहेत.
पिशाच्च वर्गातील दैवते अशी, वेताळ, भैरव, म्हसोबा, मल्ल्हारी, त्या माणसाचें पुर्वज, वास्तुदेव, ग्रामदेव, ब्रह्मराक्षस, समंध, देवचार, मुंजा, खविस, गिर्या, झोटींग इत्यादि एकंदर भरकटणारी अनेक भुते असें येतात.
निरनिराळ्या देवतांना जे नैवेद्य दिले जातात ते खाण्याबद्दल कांहीं संकेत आहेत ते असें, परमेश्र्वर पितर ह्याना दिलेला नैवेद्य-प्रसाद यजमानाने किंवा कोण्या योग्य व्यक्तिस खाण्यास द्यावा.
पिशाच्चांना दिलेला मात्र चारही दिशांना फेकून द्यावयाचा असतो. भरकटणार्या भुतांस दिलेला नैवेद्य चार रस्त्यांच्या मधोमध ठेवावयाचा असतो अथवा उकीरड्यावर ठेवावयाचा असतो

हा विषय खूप मोठा असून त्यावर भविष्यात आणखीन गप्पा आपण मारणार आहोत.

आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लोक - ६० वाचू या.
श्राद्धविधी योग्य होण्यासाठी यजमानाने मेहनत घेऊन निदान ऋग्वेदाचे एक मंडल चांगला अभ्यासलेला आहे असा किंवा, यजुर्वेदाची एक शाखा शिकला आहे असा, अथवा सामवेदाचे संपूर्ण पठण केले आहे असा शोधून काढून त्याला जेवणास बोलवावे. १४५
असें केल्याने श्राद्धविधी यशस्वी होऊन पूर्वज त्याच्या सात पिढ्या उद्धरतात. १४६
देव आदिदैवते (पितर) ह्यांना प्रसाद देतांना खालील नियमांचे पालन करावयाचे असते. लक्षात असुद्या किं, जाणकार ह्या नियमांचे पालन काळजीपूर्वकपणे करतील. १४७
श्राद्धाच्या जेवणासाठी ह्या कांहीं नातेवाईकांना आमंत्रित करावयाचे असते. आईचे वडील, मामा, बहिणीचा मुलगा, सासरा, शिक्षक, मुलीचा मुलगा, जावई, जवळचे इतर नातेवाईक आणि श्राद्ध विधी करणारे पुरोहित. १४८
देवांना प्रसाद देतांना बोलावलेल्या ब्राह्मणाची खोदून चौकशी करू नये परंतु, पितराच्या प्रसाद देतांना मात्र नीट पारखून मगच ब्राह्मण निवडांवा. १४९
मनूने असे निक्षून सांगितले आहे किं, जो ब्राह्मण चोरी करणारा, बहिष्कृत आहेत, नपुसक आहे, देव मानणारा आहे असें दुर्गुणी असतील तर त्यांना श्राद्धाच्या जेवणासाठी बोलवू नये. १५०
श्राद्धाचे जेवण जेवणे हांच ज्याचा उद्योग आहे असा, रोगट, जुगार खेळणारा, व्यसनी, अभ्यास करणारा विद्यार्थी, वेदाचा अभ्यास केलेला विद्यार्थी अशांना जेवणांस बोलवू नये. १५१
वैद्यकी करणारा, देवळाचा पुजारी, मांस विकणारा ब्राह्मण, दुकान चालवणारा ब्राह्मण, अशांना आमंत्रण देऊन बोलवू नये कारण, असें लोक देव पितर ह्यांना आवडत नाहीत. १५२ टीपः ह्याचे कारण, असें लोक वैश्य झाले असे धरले जाते.
गांवाचा पगारदार नोकर, राजाचा सेवक, नखे वेडीवाकडी असलेला, दांत काळे असलेला, जो शिक्षकाशी वितंडवाद घालतो, ज्यांने पवित्र अग्नीचा अपमान केला आहे, आणि जो सावकारी करतो असे ब्राह्मण बोलवू नयेत. १५३ टीपः ह्याचे कारण, असे ब्राह्मण शुद्र झाले असे समजले जाते.
दिवाळखोर, गुरं पाळून त्यावर उपजिविका करणारा, लहान भाऊ जो मोठ्या भावाच्या अगोदर लग्न करतो, अथवा अग्निविधी करतो, ज्यांने पांच अग्नी टाकले आहेत, जो ब्राह्मणांचा द्वेष करतो, वडील भाऊ जो लहान भावानंतर लग्न करतो, अथवा पवित्र अग्निविधी करतो, तसेंच जो भागीदारीत धंदा करतो असें ब्राह्मण श्राद्धाचे जेवण खाण्यासाठी बोलवावयाचे नसतात. १५४
नट, गायक, शिक्षण अर्धवट सोडून दिलेला, ज्याने पहिले लग्न शुद्र स्त्रीशी केले आहे, पुनर्विवाहीत स्त्रीचा मुलगा, एकच डोळा असलेला, आणि असा ज्याच्या घरात त्याच्या बायकोचा प्रियकर रहात आहे अशा ब्राह्मणांस बोलवू नये. १५५ टीपः ह्याचे कारण, असे ब्राह्मण शुद्र झाले असे समजले जाते.
पैसे घेऊन शिकवणारा, पैसे देऊन शिकणारा, ज्याची पत्नी शुद्र आहे, जो उद्धटपणे बोलतो, व्यभिचारी बाई अथवा विधवेपासून जन्मलेला. अशा ब्राह्मणांस बोलवू नये. १५६
जो स्वतःच्या आई वडीलांस वृद्ध शिक्षकांस विनाकारण टाकतो, जाती बाहेर टाकलेल्यांशी जो वेदाच्या अथवा लग्नाच्या माध्यमांने संबंध ठेवतो, त्यांस बोलवू नये. १५७
स्फोटक पदार्थांचा व्यापार करणारा, जो कधी कैदी होता, व्यभिचारी बाईच्या मुलांने दिलेले अन्न खाणारा, सोम विकणारा, समुद्रातून प्रवास करणारा, भाटगिरी करणारा (पैसे घेऊन स्तुतीची गाणी गाणारा). तेल विकणारा, खोटे वचन देणारा, अशांस बोलवू नये. १५८
स्वताच्या जन्मदात्याच्या विरोधांत न्यायालयात खटला भरणारा, दारुडा, जो असाध्य व्याधींने पिडलेला (पूर्व जन्माच्या अपराधामुळे), खुनाचा आरोप असलेला, पाखंडी, मिथ्याचारी, खाण्याचा सुगंध विकणारा, अशाना बोलवू नये. १५९
धनुष्य-बाण बनवणारा, जो बायकोवर बलात्कार करतो, मित्रांचा विश्र्वासघात करणारा, जो मुलाकडून वेद शिकतो अशांना बोलवू नये. १६०
टीपः श्राद्धाचे जेवण जो ब्राह्मण जेवतो तो ते देव पितर ह्यांच्यावतीने जेवत असतो. कारण, देव पितर सदेह येऊन जेवणे शक्य नसते. म्हणून असे ब्राह्मण जेवणासाठी बोलवायचे जे देव पितर ह्यांचे प्रतिनिधीत्व योग्य प्रकारे करू शकतील.

पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा